.. तर निरोप जड जात नाही!! माईलस्टोन नाटक ‘संगीत देवबाभळी’चा अंतिम प्रयोग ‘या’ दिवशी होणार; कधी..? कुठे..? जाणून घ्या


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भद्रकाली प्रोडक्शन निर्मित आणि प्राजक्त देशमुख लिखित, दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर जणू एक इतिहास रचला आहे. शाळा, कॉलेज, साहित्य अकादमी पर्यंत या नाटकाचे हात पोहोचले. मराठीच नव्हे तर बहुभाषिक नाट्य वेड्या रसिकांनीसुद्धा या नाटकावर भरभरू प्रेम केलं. व्यावसायिक रंगभूमीवर ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने अनेक पुरस्कार पटकावले. या नाटकाला ‘साहित्य अकादमी’ युवा पुरस्कारदेखील मिळाला आहे. विशेष आणि अभिमानाची बाब म्हणजे हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. यानंतर आता ‘संगीत देवबाभळी’ नाटकाचा हा विक्रमी प्रवास सांगतेकडे मार्गस्थ झाला आहे. उरलेल्या काहीच प्रयोगानंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर पाहता येणार नसून आता या नाटकाच्या शेवटच्या प्रयोगाची तारीख समोर आली आहे.

संगीत ‘देवबाभळी’चे दोन टप्प्यात शेवटचे काही प्रयोग सादर करुन आपण निरोप घेणार असल्याचे आधीच या नाटकाच्या टीमने सांगितले होते. त्यानुसार, पहिला टप्पा तुकाराम बीज ते आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा दुसरा आणि शेवटचा टप्पा सध्या सुरु आहे. आषाढी एकादशी दिवशी महाराष्ट्रातील शेवटच्या प्रयोगाची नेमकी तारीख जाहीर करण्यात आली. या सुनियोजित पद्धतीने आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या काळात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात शेवटचे प्रयोग सादर होत आहेत. दरम्यान अनेक प्रेक्षकांनी ‘ हे नाटक बंद करू नका’ असा आग्रह केला आहे. मात्र टीमच्या नियोजनाप्रमाणे, कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवार, २२ नोव्हेंबर २०२३ रोजी, संध्याकाळी ६.३० वाजता, श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन- मुंबई येथे या नाटकाचा महाराष्ट्रातील शेवटचा प्रयोग सादर होणार आहे.

‘निरोपाचा दिवस सांगून ठेवला तर निरोप जड जात नाही..’, असे म्हणत संगीत ‘देवबाभळी’ या नाटकाच्या टीमने अंतिम प्रयोगाच्या तारखेची घोषणा केली आहे. भंडाऱ्याच्या डोंगरावर संत तुकोबांसाठी भाकरी घेऊन गेलेली आवली काटा रूतून बेशुद्ध होते. तिला सावरायला लखुबाई बनून साक्षात रखुमाई तिच्या मदतीला धावते. यावेळी त्यांच्यात घडलेला संवाद आणि त्यांच्यातील भावनांचे बंध प्राजक्त देशमुख यांनी या नाटकात उत्तम रेखाटली आहे. रखुमाईला आवलीच्या बोलण्यातून कळलेलं तीच मन, लौकिक भान आणि साध्या सांसारिक प्रश्नांची उकल या नाटकाचा जीव आहे. या नाटकात अभिनेत्री मानसी जोशी हिने रखुमाई तर अभिनेत्री शुभांगी सदावर्तेने आवलीची भूमिका साकारली आहे. प्रसाद कांबळी यांच्या ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ने हे नाटक रंगभूमीवर आणले आणि या नाटकाने प्रेक्षकांना आपलेसे करून घेतले. या नाटकाला निरोप देताना साहजिकच रंगभूमीदेखील भावनिक होत असेल.