रवींद्र महाजनींच्या पत्नीचे आत्मचरित्र प्रकाशित; गहिवरून म्हणाल्या, ‘त्यांच्या निधनानंतर घरात…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे गतवर्षी जुलै महिन्यात निधन झाले. पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. मृत्यूनंतर ३ दिवसांनी त्यांच्या निधनाची वार्ता समोर आली आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मृत्यूपूर्वी रवींद्र महाजनी कुटुंबियांपासून वेगळे एकटेच या फ्लॅटमध्ये राहत होते. ज्यामुळे नेटकऱ्यांनी वेगवेगळे तर्क लावून त्याच्या कुटुंबाला ट्रोल केले. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर जवळपास ६ महिन्यांनी आता त्यांची पत्नी माधवी महाजनी यांनी स्वतःचं आत्मचरित्र प्रकाशित केलं आहे.

माधवी महाजनी यांच्या पुस्तकाचे नाव ‘चौथा अंक’ असे असून नुकताच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी त्यांचा लेक अभिनेता गश्मीर महाजनी उपस्थित होता. त्याने या पुस्तकाची प्रस्तावना सर्वांना वाचून दाखवत पुस्तकाचे नाव ‘चौथा अंक’ का ठेवले याची माहिती दिली. यावेळी एका नामवंत वाहिनीसोबत संवाद साधताना माधवी महाजन यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्या म्हणाल्या कि, ‘आयुष्यात खूप घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे सगळंच सांगणं कठीण होतं. त्यानंतर जवळचे नातेवाईक व माझ्या काही मैत्रिणींनी हे पुस्तक लिहिण्याचा आग्रह मला केला. सुरुवातीला मी तयार नव्हते पण, प्रेक्षकांसमोर मोकळं व्हावं असं मलाही जाणवलं. या पुस्तकातून माझा कुणालाही नायक किंवा व्हिलन बनवायचा हेतू नाही. जे माझ्या आयुष्यात खरं खरं घडलंय ते सर्व मी लिहून काढलंय’.

पुढे म्हणाल्या, ‘पुस्तकात जर काही गोष्टी लपवल्या असत्या, तर ते आत्मचरित्र झालं नसतं. फक्त चांगल्या घटना लिहायच्या असत्या, तर ती कादंबरी झाली असती. त्यामुळे मी सगळ्या खऱ्या घटना लिहिल्या आहेत. पण, यामागे माझा हेतू अगदी चांगला आहे. माझे दोष, त्यांचे दोष या सगळ्या गोष्टी मी चांगल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझं हे पुस्तक फार आधीच लिहून झालं होतं. पुस्तक छापायला मी देणार होते. पण, त्याआधीच त्यांचं निधन झालं. त्यानंतर माझ्या जवळच्या लोकांनी माझ्या विचारांना आणखी दिशा दिली. पुढे, मी पुस्तकात त्यांच्या निधनानंतर घरात बदललेली परिस्थिती व त्यानंतरचे माझे विचार या गोष्टी देखील लिहिल्या’.