हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेला ‘लावणी’ हा लोककलेचा एक प्रकार आहे. आजतागायत अनेक लावणी कलावंत होऊन गेले. प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी ओळख, एक वेगळी अदा आजही बघणाऱ्याच्या काळजात घर करून बसली आहे. मुंबईतील लालबाग परिसरात असणाऱ्या हनुमान थिएटरमध्ये तर लावणीचे फड गाजायचे. असाच एक फड गाजवणारा काळ लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांचा होता. होता म्हणण्याचे कारण असे कि, आज त्यांची अवस्था पाहिल्यावर त्या कलावंतीण आहेत याची ओळख पटणे मुश्किल झाले आहे. आज एकवेळ पोटाला आधार मिळावा म्हणून त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. हीच आहे आजच्या कलाकाराचे दुर्दैवी वास्तव..
शांताबाई लोंढे म्हणजेच लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांच्या सौंदर्याची एकेकाळी रसिकांना भुरळ पडायची. तन. मन.. धन विसरून लोक लालबागच्या हनुमान थिएटरमध्ये त्यांच्या अदाकारीवर टाळ्या, शिट्ट्या वाजवायचे. वयोमानानं याच लावणी सम्राज्ञीवर भीक मागायची वेळ यावी.. याहून दुर्दैव ते काय..? कुणी घर देत का घर….. खायला देता का मला.. असं म्हणत आयुष्य जगणाऱ्या या लावणी सम्राज्ञीची अशी दयनीय अवस्था का व्हावी..? ३० – ४० वर्षांपुर्वी शांताबाईंनी आपल्या नृत्याने उत्तर महाराष्ट्र ते खानदेश आणि अजून अनेक ठिकाणी भिका सांगवीकर, शंकरराव खर्डीकर असे तमाशाचे फड गाजवले. पहाडी आवाज, दिलखेच अदाकारी आणि घायाळ करणारा बाण…. ४० वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तार भाई यांनी ‘शांताबाई कोपरगावकर’ हा तमाशा काढला. ज्यातून शांताबाई ५० ते ६० लोकांचे पोट भरत होत्या पण आज त्यांचं पोट भरायला कुणी नाही.
यात्रेत असो किंवा थिएटरमध्ये शांताबाईंची अदाकारी पहायला गर्दी व्हायची. नुसत्या शिट्ट्या आणि टाळ्या.. पण उत्तर वय लपत नव्हतं. चेहऱ्यावर सुरकुत्या, निस्तेज काया, थकलेलं शरीर यामुळे तमाशाचा फड बंद झाला. पण म्हणून आज भीक मागून जगावे लागेल इतकी काय अवस्था वाईट व्हावी..? असं म्हणतात या महाराष्ट्रात लोककलावंताला वाव दिला जातो. पण याच महाराष्ट्राच्या मातीतील एक कलाकार वयाच्या ७० व्या वर्षी बस स्थानकावर भीक मागून कसंबसं जगत आहे, हे दृश्य मन हेलावणारं आहे. सरकारकडून काहीच मिळत नाही असं नाही.. कधीतरी पेंशन मिळते. पण पोटाची खळगी भरण्यासाठी ती पुरत नाही आणि म्हणून शांताबाई अहमदनगरच्या कोपरगाव बस स्थानकावर भीक मागून पोट भरतात. वय उतार झालंय, शरीरही थकलंय पण शांताबाईंची जिद्द अजून मोडून पडलेली नाही. त्यामुळे आजही त्यांची जगण्यासाठीची धडपड सुरु आहे. मात्र फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.