‘प्रेमास रंग यावे’ मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का; वडिलांच्या आजारपणामुळे अभिनेत्रीने सोडली मालिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये वेगवेगळ्या वाहिनीवरील विविध आशयाच्या मालिकांचा समावेश आहे. मालिकांमधील ट्विस्ट, कलाकारांचे अभिनय, पार्श्वसंगीत यांमुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असतात. दरम्यान ‘सन मराठी’ वाहिनीवरील एका मालिकेत एक मोठा बदल होणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का लागला आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची अचानक झालेली एक्झिट हि प्रेक्षकांसाठी धक्क्याचे कारण ठरली आहे.

‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेतील मुख्य भूमिका ‘अक्षरा’ साकारणारी अभिनेत्री अमिता कुलकर्णीने अचानक ही मालिका सोडल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का लागला असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता अमिताची जागा अभिनेत्री अमृता फडके भरून काढताना दिसते आहे. ज्यामुळे मनोरंजनात कोणताही खंड पडलेला नाही. पण अमिताने मालिका अचानक सोडल्याने मात्र अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अमिताने मालिका सोडली..? का तिला या मालिकेतून काढलं..? या प्रश्नांची उत्तरं स्वतः अमिताने एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहेत.

अमिताने सोशल मीडियावर एक भावुक व्हिडीओ शेअर करत भलीपोस्ट पोस्ट लिहिली आहे. यात तिने म्हटलंय, ‘मी तुम्हा सगळ्यांची लाडकी अक्षरा. तर मी हा व्हिडीओ यासाठी करते की, मला खूप मेसेज येता आहेत. खूप कमेंट वाचल्यात. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, अक्षराला का काढलं? ती अचानक का गेली? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला द्यायची आहेत. तर मला कोणी काढलं नाहीये. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. काही वैयक्तिक कारणासाठी मी हा निर्णय घेतला आहे’.

‘ते कारण असं आहे की, माझे बाबा फार आजारी आहेत आणि त्यांना सध्या माझी खूप गरज आहे. आयुष्यात तुमच्यावर कधी अशी वेळ आली, काम आणि कुटुंब यातून एकाची निवड करावी लागली. तर प्लीज कुटुंबाला प्राधान्य द्या. कुटुंब खूप महत्त्वाचं असतं. आई-वडील, नवरा-बायको, मुलं यांच्याशिवाय आयुष्यात आपण काहीच करू शकणार नाही. यांच्या पाठिंब्यामुळेच आपण पुढे जाऊ शकतो. मग जेव्हा त्यांना गरज आहे, तेव्हा त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहायला हवं. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे’.

‘मला खूप दुःख होतंय, मी या कामापासून आणि माझ्या या आपल्या माणसांपासून लांब जातेय. कारण या अक्षराला घडवण्यामध्ये खूप लोकांचा वाटा आहे. माझे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड, अनिल राऊत सर, मंदार सर, माझे हेअर, मेकअप, कॉस्टयूम टीम, स्पॉट दादा, लाइट, सेटिंग, डीओपी सर आणि विशेष आभार मानायचे आहेत ते म्हणजे जगदंब प्रोडक्शनला. सावंत दादा, अमोल कोल्हे सर, कार्तिक सर, घनश्याम सर खूप खूप धन्यवाद तुम्ही मला ही संधी दिली. तुमच्या पाठिंब्याशिवाय मी काहीच करू शकले नसते’.

”सन मराठी” वाहिनीचे देखील खूप खूप धन्यवाद, त्यांनी माझ्यातली अक्षरा बघितली. माझ्यावर विश्वास दाखवला की, मी अक्षराची भूमिका व्यवस्थितरित्या निभावू शकेल. मी माझा पूर्णपणे प्रयत्न केला. पण माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, जी नवीन अक्षरा आली आहे, तिला माझ्याचं एवढं, माझ्याहूनही जास्त प्रेम द्या. कारण ही मालिका माझी आहे, माणसं माझी आहेत. प्लीज रागवू नका किंवा ही अक्षरा का गेली? या कारणामुळे मालिका बघणं बंद करू नका. ही मनापासून विनंती आहे आणि मला माहित आहे, तुम्ही मला नाराज करणार नाही. जितकं प्रेम मला दिलं तितकं प्रेम नवीन अक्षराला सुद्धा द्याल. आपण लवकर परत भेटू. तोपर्यंत प्लीज आपली काळजी घ्या’.