मायरा वायकुळ अभिनित हिंदी मालिकेच्या सेटवर आला बिबट्या; कलाकारांची उडाली घाबरगुंडी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत बालकलाकार म्हणून प्रकाशझोतात आलेली मायरा वायकुळ आता लवकरच एका हिंदी मालिकेतून पुन्हा एकदा आपल्या भेटीस येत आहे. तिच्या या आगामी हिंदी मालिकेचे नाव ‘नीरजा – एक नई पहचान’ असे आहे. या मालिकेचे सध्या शूटिंग सुरु आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेच्या सेटवर अचानक बिबट्या घुसल्याने कलाकार वृत्त समोर आले आहे. त्यामुळे सेटवरील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘नीरजा- एक नई पहचान’ या आगामी नव्या हिंदी मालिकेचे शूटींग मुंबईत गोरेगाव फिल्म सिटीमध्ये सुरु आहे. हा संपूर्ण भाग जंगलाचा असल्यामुळे अनेकदा या ठिकाणी विविध वन्य प्राणी पहायला मिळाल्याने वृत्त याआधीही समोर आले आहे. एका नामवंत वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘नीरजा- एक नई पहचान’ या मालिकेतील एक सीन शूट होत होता. यावेळी आसपास मालिकेचे सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स उपस्थित होते. मालिकेच्या सीनसाठी आवश्यक असणारी प्रॉपर्टी उभारण्यात आली होती. ज्यातील घराच्या छतावर अनेक माकडे पावसामुळे लपून बसली होती.

यावेळी अचानक एका बिबट्याने माकडांवर हल्ला करण्यासाठी छतावर झडप घातली आणि यामुळे सेटवर नुसती घाबरगुंडी उडाली. माणसांची इतकी गर्दी पाहून बिबट्याने लगेच तिथून पळ काढला. मात्र बिबट्याचा सेटवरील वावर पाहून भल्याभल्यांची बत्ती गुल्ल अली होती. सेटवरील करू मेंबर्स आणि कलाकारांची नुसती तारांबळ उडाली. दरम्यान ‘नीरजा- एक नई पहचान’ ही मालिका येत्या १० जुलै २०२३ पासून कलर्स टीव्ही वाहिनीवर सुरु होणार आहे. यामध्ये मराठी अभिनेत्री स्नेहा वाघ, बालकलाकार मायरा वायकुळ आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.