‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील शालिनीची मल्हारसाठी पोस्ट; म्हणाली, ‘तू एक माणूस म्हणून किती..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. मालिकेतील जयदीप- गौरी यांच्यासह शालिनी, मल्हार, देवकी, दादा, माई यांच्याही भूमिका चांगल्याच गाजत आहेत. या मालिकेत ‘मल्हार’ हे पात्र साकारणारा अभिनेता कपिल होनराव याचा मंगळवारी वाढदिवस होता आणि यानिमित्त ‘शालिनी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री माधवी निमकरने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिने कपिलसोबतचे दोन फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री माधवी निमकरने हि पोस्ट शेअर करताना लिहिलंय कि, ‘आज तुझा वाढदिवस आहे. इतक्या शुभेच्छा आहेत की त्या मला शब्दात मांडता येणार नाहीत. खूप मेहनती आहेस, उत्तम काम करतोस आणि अजून उत्तम काम करायची ताकद तुझ्यात आहे. जेव्हा तुला एखादा सीन आवडत नाही, तेव्हा तू किती अस्वस्थ होतोस ते मी पाहिलं आहे आणि हे अस्वस्थ होणं म्हणजेच उत्तम अभिनेता असण्याचा गुण आहे. त्याबरोबरच तू एक माणूस म्हणून, मित्र म्हणून किती चांगला आहेस हे माझ्याशिवाय उत्तम कोणी सांगू शकत नाही’.

‘मला नेहमी माझ्यात चांगलं काय आणि वाईट काय हे तू दाखवलं आहेस आणि त्याबरोबरच काय चुकीचं आहे, हे देखील सांगितलं आहेस. एक मित्र म्हणून कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास आणि यापुढेही राहशील याची मला पूर्ण खात्री आहे. खूप मोठा हो, मेहनत कायम ठेव. तू उत्तम काम करत राहशील, याची मला खात्री आहे. कपिल तुला भरभरुन शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुला जे जे हवं ते सर्व मिळू दे. खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद. धमाल कर आणि तुझा दिवस आनंदात घालव’. या पोस्टवर मल्हारने म्हणजेच कपिलने प्रतिक्रिया देत ‘धन्यवाद’ असे म्हटले आहे.