प्रेक्षकांच्या लाडक्या अरुंधतीला मिळाला ‘हा’ महत्वाचा पुरस्कार; अभिनेत्रीने सोशल मीडियावर मानले आभार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधती हि मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले सोशल मीडियावर फार सक्रिय असते. या माध्यमातून ती कायम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होताना दिसते. अशातच मधुराणी प्रभुलकरला नुकतंच ठाणे महानगरपालिकेच्या ‘गंगा जमुना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यानिमित्त तिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत मधुराणी प्रभुलकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘जनकवी पी. सावळाराम कला समिती आणि ठाणे महानगरपालिका ह्यांच्या तर्फे दिला जाणारा ‘गंगा जमुना’ पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद झाला. तो ही ज्येष्ठ संगीतकार श्रीधरजी फडके, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार सर, प्रा. मंदार टिल्लू आणि निवेदिका सानिका कुलकर्णी ह्या चतुरस्त्र मंडळींसमवेत..!! कविता आणि कवी ह्यांची माझ्या हृदयात एक खास जागा असताना कवीच्या नावे पुरस्कार मिळणं हे फार काव्यत्मकच वाटतंय’.

‘विठू माझा लेकुरवाळा, धागा धागा अखंड विणूया, पंढरीनाथा झडकरी आता, अशी पी .सावळाराम ह्यांची कितीतरी गाणी आईनी मला लहानपणी शिकवली. त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना वर्तुळ पूर्ण झाल्याचा भास झाला आणि ठाणे ही गेली ४ वर्ष माझी कर्मभूमी आहे. ज्या मालिकेने मला घराघरात आणि रसिकांच्या मनात पोहचवलं त्याचं शूट ठाण्यात चालतं. त्यामुळे गेली 4 वर्ष मी ठाणेकरच आहे. ठाणेकरांच्या रसिकतेविषयी आम्हा कलाकारांमध्ये कायम चर्चा असते आणि ती रसिकता अगदी खुर्चीतल्या मंडळींकडेसुद्धा आहे हे मी वेळोवेळी अनुभवलं. त्याचंच एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ठाण्याचे माजी महापौर नरेशजी म्हसके!!!’

‘एका कार्यक्रमात मी गायलेल्या गझलचा आवर्जून उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणात केला, ह्यातच सारं आलं. अशा दिलखुलास व्यक्तीकडून पुरस्कार स्वीकारणं आणखीनच संस्मरणिय होत. वर्ष सरताना, दरवर्षी मला सरलेल्या वर्षाचा मनातल्या मनात जमाखर्च मांडायची सवय आहे. ह्या पुरस्काराने जमेची बाजू इतकी वाढली की बाकी सर्व दुखऱ्या खर्चाच्या बाजू दिसेनाश्याच झाल्या. माझ्या संपूर्ण प्रवासात मला साथ देणाऱ्या, प्रेम देणाऱ्या, मला सांभाळून, समजून घेणाऱ्या, माझ्या चूका दाखवत मला घडवणाऱ्या प्रत्येकाला आणि प्रत्येकीला मी हा सन्मान अर्पण करते’.