‘भीतीची भावना पार केली..’; मधुराणीने शेअर केला शुटिंगदरम्यानचा अनुभव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायम चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेचा टीआरपी सर्वोच्च स्थानावर आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिकेतील पात्र घराघरांत लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील अरुंधतीवर प्रेक्षक अक्षरशः जीव ओततात. हि भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अतिशय उत्तमरित्या साकारली आहे. त्यामुळे मधुराणीचा चाहता वर्ग प्रचंड वाढला आहे. दरम्यान मालिकेच्या शुटींगवेळी आलेला एक अनुभव मधुराणीने चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. कायम वेगवेगळे व्हिडीओ, फोटो आणि कविता सादरीकरणाचे व्हिडीओ ती शेअर करत असते. नुकताच तिने मालिकेच्या शुटींग दरम्यानचा स्वतःचा अनुभव शेअर केला आहे. यावेळी मधुराणी घाटात गाडी चालवताना दिसते आहे. या व्हिडीओ सोबत तिने लिहीलं आहे की, ‘रोज नवीन काहीतरी शिकत असतो आपण…!! गाडी चालवायला आवडतेच मला.. पण तशी उशीरा शिकले चालवायला.. अलीकडेच म्हणायला हवं. गाडी येणं याचे अनेक फायदे वेळोवेळी अनुभवले. पण अशी कधी गाडी चालवू असा विचारही केला नव्हता’.

‘रिग , कॅमेरा आणि घाटातला प्रवास…!! त्यात घाटात गाडी सांभाळायची, संवाद म्हणायचे, इमोशन्स सांभाळायच्या, रस्त्यावरचं लक्ष ढळू द्यायचं नाही… ही तारेवरची कसरत होती. सुरुवातीला जरा भीती वाटली पण नंतर मजा यायला लागली. भीतीची भावना पार केली तरच अनुभव गाठीशी गोळा होतात. नाहीतर आपण तिथेच राहतो, नाही का…?’ मधुराणीच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, मालिकेत मधुराणी म्हणजेच अरुंधती आणि आशुतोष हनीमूनला निघाले आहेत. त्यामुळे मालिकेच्या येत्या भागांमध्ये अरुंधती आणि आशुतोषचे रोमँटिक सीन पहायला मिळणार आहेत.