‘मधुरव बोरु ते ब्लॉग’च्या शिरपेचात मानाचा तुरा; जगविख्यात ‘काला घोडा फेस्टिवल’च्या शुभारंभी होणार खास प्रयोग


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मराठी असे आमुची मायबोली आम्ही मराठीतच बोलणार’ असं म्हणणाऱ्यांपासून ते ‘मराठी आहोत हे सांगायला लाज वाटते’ असं सांगणाऱ्या नव्या पिढीपर्यंत प्रत्येकाने पाहायलाच हवा असा मराठी भाषेचा अभिजात दर्जा कायम राखणारा ‘मधुरव बोरू ते ब्लॉग’ या कार्यक्रमाच्या शिरपेचात मानाचा तुरा लागला आहे. ‘राजभवन‘, ‘गेटवे ऑफ इंडिया‘, ‘महाराष्ट्र सदन‘, ‘रॉयल ऑपेरा हाऊस‘ अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये प्रयोग झाल्यानंतर आता काला घोडा फेस्टिवलमध्ये याचा प्रयोग होणार आहे आणि ही अत्यंत गौरवाची बाब आहे.

नाटक नृत्य संगीत याच्या माध्यमातून दोन हजार वर्षांचा प्रवास मनोरंजनाच्या माध्यमातून उलगडत जाणारी ‘मधुरव बोरु ते ब्लॉग’ ही कलाकृती यंदाच्या काला घोडा फेस्टिवलच्या शुभारंभाच्या दिवशी म्हणजेच उद्या शनिवार, २० जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता वाय बी चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, अशी विनंती मेकर्सकडून करण्यात आली आहे.

डॉ. समीरा गुजर लिखित, मधुरा वेलणकर साटम दिग्दर्शित ‘मधुरव बोरू ते ब्लॉग’ या कार्यक्रमाचे संगीत श्रीनाथ म्हात्रे यांनी केले असून नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे यांनी केले आहे. तर प्रकाशयोजना शितल तळपदे आणि नेपथ्य प्रदीप पाटील यांचे असून मधुरा वेलणकर साटम, आकांक्षा गाडे आणि आशिष गाडे यांच्या या कार्यक्रमात प्रमुख भूमिका आहेत. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही गाजत असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी हा कार्यक्रम बघायला विसरू नका. ज्या मराठीमध्ये आपली ओळख दडली आहे त्या मराठीची नव्याने ओळख करून घेण्यासाठी हा कार्यक्रम बघायला नक्की या आणि श्रीमंत व्हा, असे आवाहन कार्यक्रमाच्या टीमने केले आहे.