माधुरी दीक्षितने पती श्रीराम नेनेंसह घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; व्हिडीओ झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित हि कायम काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. आताही गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने चर्चेचा विषय ठरले आहेत. याचे कारण आहे त्यांचा आगामी मराठी चित्रपट ‘पंचक’. हा चित्रपट येत्या शुक्रवारी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ हा मराठी चित्रपट त्याच्या घोषणेपासून चर्चेत आहे. अत्यंत वेगळे कथानक असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झाले आहेत. या चित्रपटाच्यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित तिचे पती श्रीराम नेनेंसह ठिकठिकाणी प्रमोशनसाठी जाताना दिसत आहे. अशातच आज माधुरीने आणि श्रीराम यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली.

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने सिद्धिविनायक मंदिरात गेले असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी माधुरीच्या चाहत्यांनी तिची एक झलक पाहण्यासाठी मंदिराबाहेर गर्दी केली होती. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, भारती आचरेकर, आदिनाथ कोठारे, आनंद इंगळे, सागर तळाशीकर, तेजश्री प्रधान, दीप्ती देवी, आरती वडगबाळकर, नंदिता पाटकर अशी तगडी स्टारकास्ट आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो..? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.