सईला मिळणार आईचं प्रेम..?; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा महाएपिसोड कथानकात आणणार ट्विस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘प्रेमाची गोष्ट’ हि नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. अगदी अल्पावधीतच ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यामुळे प्रेक्षकही या मालिकेला चांगला प्रतिसाद देत आहेत. मालिकेतील मुक्ता, सागर, सई, सावनी या व्यक्तिरेखांभोवती फिरणारे कथानक आता वेगळ्या आणि रंजक वळणावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे मालिकेने आवश्यक तसा टीआरपीदेखील ओढला आहे.

मालिकेच्या अलीकडच्या भागात एकीकडे मुक्ताचा साखरपुडा ठरतो. तर दुसरीकडे तिच्या लाडक्या सईवर संकट येते. एक्स्पायर झालेले कफ सिरप दिल्यामुळे सईची तब्येत बिघडते आणि अशावेळी मुक्ताचं सईकडे लक्ष जातं. तिच्या तोंडातून फेस येता असतो हे पाहून मुक्ता तिला तातडीने रुग्णालयात दाखल करते. यावेळी सईवर उपचार करण्यासाठी एका फॉर्मवर तिच्या आई-वडिलांची सही हवी असते आणि यावेळी मुक्ता सागरला फोन करते. मात्र नशेत असल्यामुळे सागर झोपलेला असतो. मुक्ता सईच्या आईचा अर्थात सावनीचा शोध घेते. पण सावनीचा पती तिला पाठवण्यास नकार देतो. त्यामुळे मुक्ता सईची आई म्हणून त्या फॉर्मवर सही करते आणि तिच्यावर उपचार सुरू होतात.

तर दुसरीकडे मुक्ताच्या साखरपुड्यासाठी सर्व पाहुणे मंडळी तिच्या घरी आलेले असतात. यावेळी सागरने मुक्ता विरोधात सईच्या अपहरणाची तक्रार केल्यामुळे पोलीस गोखलेंच्या घरी पोहोचतात आणि गदारोळ होतो. यावेळी एक्स्पायर झालेल्या कप सिअरपची बॉटल गोखलेंकडे कचऱ्याच्या डब्यात सापडते. ज्यामुळे मुक्ताच्या आई-वडिलांना अटक होते. या प्रकारामुळे मुक्ताचा साखरपुडा मोडतो. सागरचे वडील अपहरणाची तक्रार मागे घेतात आणि गोखलेंची सुटका करतात.

यानंतर आता येत्या २२ ऑक्टोबर रोजी मालिकेचा महाएपिसोड आहे. ज्यामध्ये काही महिला सईला तिच्या आईच्या हवाली करण्यासाठी आंदोलन करताना पाहायला मिळणार आहेत. पण यामुळे सई आई सावनीकडे जाणार..? का सई आणि मुक्ताच्या नात्याला नवे नाव मिळणार..? हे पाहणे रंजक ठरणार आहे.