‘खरा तो एकची धर्म…’; ‘श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे यांचे संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘श्यामची आई’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. जो ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. चित्रपटातील सेट, कलाकारांचा लूक ते कथा, संवाद आणि सादरीकरण याबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता पहायला मिळते आहे. दरम्यान ‘श्यामची आई’ चित्रपटात ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे…’ या प्रार्थनेला शास्त्रीय संगीत गायक महेश काळे यांनी वेगळ्या अंदाजात कर्णमधुर बनविले आहे.

या चित्रपटात साने गुरुजींनी लिहिलेली ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..’ ही प्रार्थना आपल्याला ऐकायला मिळते आहे. ज्याला नवे सुर आणि नवी चाल देऊन महेश काळे यांनी प्रेक्षकांसमोर आणले आहे. या गाण्यासंदर्भात महेश काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी महेश काळे म्हणाले कि, ‘या गाण्यासंदर्भात मला आकाश पेंढारकर यांचा फोन आला. मला ते म्हणाले, ’तू गाणं गाशील का..?’, मी त्या गाण्याचे शब्द पाहिले आणि पहिल्या दोन ओळी ऐकून माझा गाणं गाण्याचा निर्णय पक्का झाला. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे…’ कायम गायक म्हणून आपण तन्मयतेने तल्लीनतेने प्रेम वाटत असतो. पण त्याला जर सामाजिक भावनेची झालर मिळाली तर या सगळ्या कार्याला एक वेगळं स्थान प्राप्त होतं’.

पुढे म्हणाले, ‘किंबहुना मला असं वाटतं ज्या समाजाने मला प्रेम दिलंय त्या समाजाचं मी देणं लागतो. याचा विचार करताना या प्रार्थनेला चाल लावण्याचे भाग्य मिळणं यातून समाजाची परतफेड करण्याची संधी मला मिळाली. हे गाणं नसून प्रार्थना आहे, एक संवेदना आहे..हे गाणं प्रत्येकाच्या मनात बसलं पाहिजे. गाण्याचे शब्द कायम लक्षात राहतील यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केले आहेत’. विशेष सांगायचे म्हणजे, महेश काळे यांनी संगीतबद्ध केलेली ही प्रार्थना निर्मात्यांनी सर्व शाळांसाठी खुली ठेवली आहे. सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांनी केली असून भाऊसाहेब, अजय, अनिरुद्ध आरेकर, आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत.