हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट,मालिका, रंगभूमी यांसारख्या विविध मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचं काही महिन्यांपुर्वी निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्व हादरून गेले. त्यांच्या जाण्याने कधीही भरून निघणार नाही अशी पोकळी निर्माण झाली. दरम्यान विक्रम गोखले यांनी अभिनय केलेला त्यांचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सूर लागू दे’ असे असून नुकतेच याचे पोस्टर रिलीज झाले. यावेळी महेश मांजरेकर भावुक झालेले दिसले.
विक्रम गोखलेंचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘सूर लागू दे’ या चित्रपटाच्या पोस्टर अनावरणावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी विक्रम गोखले यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. ते अत्यंत भावनिक स्वरात म्हणाले, ‘मी त्यांच्यासोबत चांगले क्षण घालवले. मी त्यांच्यासोबत नटसम्राट सिनेमात काम केलं. ते काही क्षण सिनेमानिमित्त होते पण बाकी आम्ही मी शिवाजी पार्क आणि इतर काही सिनेमात एकत्र वेळ घालवला. ते दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणुन आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. हा त्यांचा शेवटचा सिनेमा खुप ब्लॉकबस्टर होवो ही माझी अपेक्षा आहे’.
दिनांक ३० ऑक्टोबर रोजी अभिनेते विक्रम गोखले यांचा वाढदिवस असतो. म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधत निर्मात्यांनी बांद्रा येथील एमआयजी क्लबमध्ये विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली विक्रम गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत या पोस्टरचे अनावरण केले. अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते ‘सूर लागू दे’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते नितीन उपाध्याय आणि अभिषेक ‘किंग’ कुमार यांनी ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर रतीश तावडे, अश्विन पांचाळ आणि देवांग गांधी या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी केले आहे.