‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ पाहिल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, ‘नाटक साधं पण…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटांइतकाच मोठा प्रेक्षक वर्ग मराठी नाटकांचा आहे. .. आणि नाटक म्हटलं कि प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांची जोडी डोळ्यासमोर येते. गेली अनेक वर्ष कविता मेढेकर आणि प्रशांत दामले मराठी नाटक, मालिका, चित्रपट यांसारख्या विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. पण त्यांचं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक एव्हरग्रीन आहे. आजही या नाटकाला प्रेक्षकांची मोठी गर्दी पहायला मिळते. या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आहेत. पण नाटकातली गोडी अजूनही तितकीच प्रभावी आहे. नुकतंच या नाटकाबद्दल अभिनेत्री मनवा नाईकने एक पोस्ट शेअर केली आहे.

मनवा नाईकने हि पोस्ट शेअर करताना लिहिलं, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट… अहाहाहाहा काय प्रसन्न आणि आनंद देणारा अनुभव, नाटक एका लग्नाची पुढची गोष्ट! गोष्ट साधी, सरळ, गंमतशीर…आणि आमचा मित्र लेखक/दिग्दर्शक अद्वैत दादरकरने त्या गोष्टी मधला गोडवा जपत नाटकाची वीण किती घट्ट तरीही किती सुरेख गुंफली आहे! ती परी अस्मानीची… आणि मला सांगा सुख म्हणजे…ही दोन्ही गाणी प्रेक्षागृहात जे चैतन्य आणत ती अनुभवण्याची गोष्ट आहे.

प्रशांत दामले ह्यांना रंगमंचावर पाहणं ही केवळ ट्रीट आहे… असा देखणा, विनोदी गायक नट होणे नाही….एनर्जी चा धबधबा! आणि कविता लाड…अबब…काय ग्रेस…काय टायमिंग ..सुंदर नटी आणि अतिसुंदर काम… अतुल तोडणकरचे काम कमाल झाले आहे. हे ह्या तगड्या नटसंचात मिसळून त्यांना उत्तम साथ देतात… नाटक साधं पण रंजक आहे.’

‘आणि विशेष आनंद म्हणजे… माझ्या दोन मैत्रिणींबरोबर हे नाटक पाहिलं त्यामुळे आनंद द्विगुणित नाही तर त्रिगुणित झाला… अशी ही ही अविस्मरणीय संध्याकाळ… निखळ आनंद आणि केवळ आनंद!’ मनवाच्या या पोस्टवर अभिनेत्री कविता मेढेकर यांनी आवर्जून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मनवा आणि तिच्या मैत्रिणी मधुगंधा, ज्योती यांचे आभार मानले आहेत. यावर मानवाने हार्ट इमोजी रिप्लाय केला आहे.

अभिनेत्री कविता लाड मेढेकर आणि अभिनेता प्रशांत दामले यांचं ‘एका लगाची पुढची गोष्ट’ हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रभारत ठिकठिकाणी गाजतंय. या नाटकातील ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणं तर एकाच वेळी आयुष्यातील बरेच धागे एकत्र विणणारे आहे. त्यामुळे या गाण्याला कडाडून टाळ्या येतात. कलाकारांचा अभिनय आणि उत्तम नेपथ्यासह कर्णमधुर संगीताची साथ लाभल्यामुळे हे नाटक अजूनही रंगभूमीवर चिरतरुण आहे.