‘एखाद्या वास्तूत येतांना सकारात्मक…’; अभिनेत्याने शेअर केला शिंदेंच्या बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतरचा अनुभव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाल्यानंतर अनेक नेतेमंडळी, मराठी तसेच बॉलिवूड सिने मंडळी आणि अनेक दिग्गज लोक दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या घरी अनेक मराठी कलाकार एकत्र आले असताना शिंदेंनी सर्वांचा यथोच्च पाहूणचार केला. यावेळी स्पृहा जोशी, गौरव घाटणेकर, दीपाली सय्यद, ओंकार भोजने, नम्रता संभेराव, जयवंत वाडकर, श्रृती मराठे, सुकन्या मोने, विशाखा सुभेदार, अमृता खानविलकर, रसिका वेंगुर्लेकर, सचिन गोस्वामी यांसह ‘धर्मवीर’ सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाईदेखील बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित होते. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर स्वतःचा अनुभव शेअर केला आहे.

अभिनेता मंगेश देसाई यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मुख्यमंत्र्यांच्या घरी अर्थात वर्षा बंगल्यावर अनेक मराठी कलाकार गणपती बाप्पाचं दर्शन घेताना तसेच बाप्पाची आरती करताना दिसले. हा व्हिडीओ शेअर करताना मंगेश देसाई यांनी लिहिले आहे कि, ‘गेल्या ६० वर्षात जो सोहळा वर्षा बंगल्यात घडला नाही तो मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षात झाला. गणेश दर्शन सोहळा. संपूर्ण चित्रपट, मालिका, नाट्य सृष्टी वर्षा बंगल्यावर मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून गणेश दर्शन आणि स्नेहभोजनाला जमली होती’.

‘एखाद्या वास्तूत येतांना सकारात्मक उर्जेसह येणे आणि तशीच सकारात्मकता देऊन जाणे या पेक्षा मोठ्या शुभेच्छा कुठल्याच नाहीत. मा. मुख्यमंत्री सगळ्यांना भेटून विचारपूस करत होते. खासदार श्रीकांतजी प्रत्येकाला भेटून मनसोक्त गप्पा मारत होते. हे केवळ सामान्यांची जाणीव आणि कलावंतांवर प्रेम असेल तरच शक्य आहे. मलाही आरतीचा लाभ मिळाला. बाप्पाकडे एकच मागणं, साहेबांची प्रकृती उत्तम ठेव आणि पुढच्या वर्षात पुन्हा साहेबांच आमंत्रण सगळ्यांना येऊ दे आणि तुझं दर्शन घडू दे’.