‘याच हट्टाग्रहाने…’; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचा अपमान.. मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच १९ नोव्हेंबर २०२३ रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. ज्यामुळे देशभरातून नाराजी व्यक्त केली गेली. या सामन्याबद्दल क्रीडा, राजकीय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातून दिग्गजांच्या प्रतिक्रिया आल्या. दरम्यान एका मराठी अभिनेत्याने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने जंगी पार्टी केली. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधील एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिशेल मार्श खुर्चीवर बसलेला दिसतोय. त्याच्या हातात एक बाटली आहे आणि त्याने विश्वचषकाच्या ट्रॉफीवर पाय ठेवला आहे. हा फोटो पाहून नेटकाऱ्यानी संताप व्यक्त केला आहे. याचसंदर्भात अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी हा व्हायरल फोटो शेअर करत लिहिले आहे कि, ‘ ”आपल्यावर” पूर्वापार झालेले ”संस्कार”… पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेल्या प्रत्येकाने ग्राह्यच मानावेत… त्यानुसारच जगावं.. अन्यथा… याच हट्टाग्रहाने जगात दहशतवाद आणला असेल ना…?’ स्वप्नील राजशेखर यांची हि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान स्वप्नील राजशेखर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ते झी मराठीच्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अधिपतीच्या वडिलांची म्हणजेच चारुहास सूर्यवंशी ही भूमिका साकारत आहेत.