‘सिनेमाजगतातही व्यवस्थेचे पाय चाटणार्‍या..’; ’12th फेल’ सिनेमासाठी मराठी अभिनेत्याची पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. या माध्यमातून ते वेगवेगळे विषय परखडपणे मांडताना दिसतात. आताही सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. राजकीय, सामाजिक आणि सिनेइविश्वातील वेगवेगळ्या विषयांवर कायम मत व्यक्त करणाऱ्या किरण माने यांनी आज अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ’12th फेल’ या बॉलिवूड सिनेमाचे कौतुक केले आहे.

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘…या वर्षात आलेल्या आणि मी पाहिलेल्या सिनेमांमध्ये परिपूर्ण, आशयसंपन्न कलाकृती म्हणून खर्‍या अर्थानं भावले, ते मराठीत ‘तेंडल्या’ आणि हिंदीत ’12th फेल’ ! ‘तेंडल्या’ फारसा चालला नाही याचं लै दु:ख झालं. मराठीत अशी सर्वांगसुंदर कलाकृती लै वर्षांत आली नव्हती. असो. तेंडल्याचे दिग्दर्शक हार मानणारे नाहीत हे त्यांनी सिनेमातनंही सांगीतलं आहे. आज ना उद्या ते मराठीला अभिमान वाटेल अशी दुसरी कलाकृती घेऊन उसळी मारुन येणार. …पण 12th फेलनं मात्र कमाल केली. आज दोन महिने झाले पिच्चरला. सातार्‍यात आजही हा हाऊसफुल्ल सुरू आहे ! परवा ख्रिसमस दिवशी मी चौथ्यांदा हा सिनेमा बघितला. थिएटर फुल्ल भरलं होतं. शेवटी दुष्यंतकुमार मनोजला सॅल्यूट मारतो तेव्हा अख्ख्या थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला ! लै भारी वाटलं. बाहेर पडताना प्रत्येकजण डोळे पुसत होता आणि छाती अभिमानानं भरून आली होती’.

‘हल्ली आपल्या भवताली बेईमान, भ्रष्ट, कुटिल लोकांची सद्दी असताना एका इमानदार, नितळ, सरळमार्गी तरूणाचा ‘नो चिटींग’ वाला प्रवास सगळ्यांना भारून टाकतो… प्रेरणा देतो… दिलासा देतो. हा सिनेमा पुन:पुन्हा बघताना, मला लै गोष्टी नव्यानं जाणवल्या. “तुम झूठ को भी सच की तरह बोलते हो, न्यूज़ रिपोर्टर बन जाओ.” या डायलाॅगला प्रेक्षकांमधून आलेला लाफ्टर अर्थपूर्ण होता. “ये पीछे नहीं हटते… ये नीचे नहीं झुकते…हार नहीं मानते साले… बड़ा पक्का होता है इनका ये जज़्बा… और तुम देखना, यही जज़्बा एक दिन देश बदलेगा.” या डायलाॅगला आलेली वाहवा आणि शिट्ट्या एका दुर्दम्य आशावादातनं ‘दिल से’ आलेल्या जाणवत होतं. …क्लायमॅक्स सिनला इंटरव्ह्यूमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मनोज जे बोलतो, त्याला प्रेक्षकांतनं आलेली उत्स्फूर्त दाद पाहून आनंदाश्चर्याचा धक्का बसला’.

‘ “…इस जमी-जमाई व्यवस्था को कोई बदलनाही नहीं चाहता. जिसके पास पाॅवर है, वो पाॅवर कभी छोडनाही नहीं चाहता. गरीब अगर अनपढ रहेगा, तभी तो भेडबकरीयोंकी तरह इन नेताओंके इशारे पे चलता रहेगा… और सभी जानते है की यहीं अनपढ लोग इनका ‘वोट बॅंक’ है, जो धर्म और जात के नाम पर वोट देते आये हैं ! इसलिए डाॅ. आंबेडकरने कहा था, ‘एज्यूकेट, एजीटेट ॲन्ड ऑरगनाईज’ ! अब जनता अगर पढ लिख गयी तो नेताओंके लिए बडी समस्या हो जायेगी…नहीं?” सिनेमाजगतातही व्यवस्थेचे पाय चाटणार्‍या, प्रोपोगंडाच्या नासलेल्या भवतालात… साधासरळ, प्रामाणिक, वास्तववादी ’12th फेल’ सुपरहिट झाला ही या वर्षीची सगळ्यात आशादायी गोष्ट. सलाम विधू विनोद चोपडा. कडकडीत सलाम मनोजकुमार शर्मा!!!’