प्राजक्ता गायकवाड वारीमध्ये दंग; स्वयंपाक केला.. टाळ वाजवले अन फुगडी खेळण्याचाही लुटला आनंद


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या अवघा महाराष्ट्र वारी सोहळ्याच्या उत्साही वातावरणात भक्तिमय झाला आहे. वारकरी संप्रदाय विठुरायाच्या भेटीची आस उराशी बाळगून विठूनामाचा गजर करत दिवस, रात्र, ऊन, पाऊस विसरून अनवाणी पायी चालत आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही वारीच्या या मनप्रफुल्लित करणाऱ्या वातावरणात अनेक मराठी कलाकार मंडळी सहभागी होताना दिसत आहेत. हे कलाकार वारीतील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत विठुरायाच्या भक्तांची सेवा करताना दिसतात. यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यंदाही वारीमध्ये सहभागी झाली आहे. नुसती सहभागी नव्हे तर ती तिच्या परीने शक्य आहे तशी वारीला मार्गस्थ झालेल्या भक्त मंडळींची सेवा करत आहे. याबाबत ती तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून वारंवार अपडेट देत आहे. आतापर्यंत तिचे वारीतील अनेक व्हिडिओ तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यातील एका व्हिडिओत ती इतर महिलांसोबत स्वयंपाक बनवताना पोळी लाटत असल्याचे दिसत आहे. यासोबत तिने कॅप्शमध्ये लिहिले कि, ‘आज आषाढी एकादशी निमित्त वारी चं स्पेशल शूट होतं. याच्या मध्ये या माऊलींसोबत स्वयंपाक करताना मन अगदी भरून आलं’. याशिवाय आणखी एका व्हिडिओमध्ये प्राजक्ता वारकऱ्यांबरोबर भजन कीर्तनात टाळ वाजवत दंग झालेली दिसत आहे. इतकंच काय तर आणखी एका व्हिडिओत ती एका आजींबरोबर मस्त फुगडी खेळताना दिसतेय.

मुख्य म्हणजे फुगडी झाल्यानंतर तिने आजींना वाकून नमस्कार केला आणि इथे तिने पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. वारीतील प्रत्येक प्रसंग अनुभवताना प्रत्येक क्षणाची सोबती होताना प्राजक्ताच्या चेहऱ्यावर ओसंडणारा आनंद काही वेगळाच आहे. या सगळ्याचा ती मनापासून आदर करत आनंद घेते आहे हे पाहून नेटकरी तिच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत.