इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलावंतांनी दिला मदतीचा हात


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी रायगड जिल्यातील खालापूरमधील इर्शाळवाडी गावात भूस्खलन झाले होते. ज्यामध्ये संपूर्ण गाव डोंगराखाली गाडलं गेलं. या अपघाताच्या ४ दिवसांनी बचाव कार्य थांबवण्यात आले. इर्शाळवाडीची एकूण लोकसंख्या २१९ होती. यातील २७ जणांचे मृतदेह सापडले. तर ५३ जणांचा शोध लागलेला नाही. शासनाने या दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सिडकोमार्फत त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. दरम्यान मनोरंजन विश्वातूनही अनेक कलाकार मंडळी आपल्या बाजूने मदत करताना दिसत आहेत.

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी शासनासोबत आता मनोरंजन विश्वातील कलाकारदेखील पुढे सरसावले आहेत. लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांनी खालापूर इर्शाळवाडी गावातील दुर्घटनाग्रस्त बांधवांना घर बांधुन देण्याचे वचन दिले आहे. तर अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीसाठी आवाहन केले आहे. शिवाय तिची टीम दुर्घटनाग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता करत आहे. त्याचबरोबर अनेक नाट्यवंतही दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत करणार आहेत. आपल्या नाट्य प्रयोगाच्या कमाईतून काही भाग ते इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देणार आहेत.

अष्टविनायक नाट्यसंस्थेच्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ या लोकप्रिय नाटकाच्या एका प्रयोगाची पूर्ण कमाई इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्यासाठी देण्यात येणार आहे. हा खास प्रयोग येत्या ५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ४ वाजता ‘यशवंत नाट्यसंकुल, माटुंगा’ येथे होणार आहे. याबाबत नाटकाचे निर्माते दिलीप जाधव यांनी माहिती दिली आहे. तर अद्वैत थिएटरच्या ‘करुन गेलो गाव’ या लोकप्रिय नाटकाचे १५ ऑगस्ट २०२३ रोजी तीन प्रयोग होणार आहेत. या नाटकाच्या एका प्रयोगाच्या कमाईतील ठरावीक रक्कम ही दुर्घटनाग्रस्तांना मदत म्हणून देणार असल्याचे निर्माते राहुल भंडारे यांनी सांगितले.