हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच गोरेगाव फिल्म सिटीमध्ये अनेक मालिका, चित्रपट, रिऍलिटी शोंचे सेट असल्यामुळे इथे कायम शूटिंग सुरु असते. त्यामुळे कलाकार मंडळी, तंत्रज्ञ आणि कला विश्वातील अनेक दिग्गज मंडळींची येथे ये जा असते. मात्र मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक वासू पाटील यांच्यासोबत इथे धक्कादायक प्रकार घडला आहे. दिग्दर्शक वासू पाटील यांनी रावरंभा’, ‘झाला बोभाटा’, ‘हाफ तिकीट’, ‘टुरिंग टॉकीज’ यांसारख्या चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे. फिल्म सिटीतील सुरक्षारक्षकांनी वासू पाटील यांना ओळखपत्र पाहूनही गेटवर अडवून धरले अन अपमानस्पद वागणूक दिली. यावेळी वासू पाटील यांनी थेट अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना फोन लावला व सुरक्षा रक्षकांसोबत त्यांचे बोलणे करून दिले. पण तरीही सुरक्षा रक्षकाने त्यांना आत जाऊ दिले नाही. यामुळे त्यांना मनस्ताप झाला. अभिनेता अंकुर वाढवेने ही पोस्ट सोशल मीडियावर शेयर करत कारवाईची मागणी केली आहे.
वासू पाटील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘धक्कादायक, काल काही कामानिमित्त मी मुंबईमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये चाललो होतो. नियमानुसार मला सुरक्षारक्षक यांनी मला विचारपूस करण्यासाठी अडवले. मी ही थांबलो, पण मी माझे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे ओळख पत्र दाखवले, तर उत्तर आले असले कार्ड चालत नाही. मी बोललो मी कला दिग्दर्शक आहे मला, ‘जगदंब क्रिएशन’ च्या सेटवर मिटिंगला जायचे आहे, तर बोलले की आम्ही नाही ओळखत. कॉल लावून द्या नाहीतर मेसेज दाखवा. मी निर्मात्यांचा मेसेज दाखवला तर बोलला की असले मेसेज फेक असतात. मग मी डायरेक्ट डॉ. अमोल कोल्हे यांना संपर्क करून त्यांना बोलायला दिले तर मग पोपटासारखा बोलायला लागला आणि फोन बंद होताच पुन्हा मला नियमाने आत सोडायला येणार नाही, तुम्ही कोणालाही कॉल कराल, मी नाही ओळखत असं म्हणाला’.
‘मग मला बोलला ‘जावा पुढे कसे जाता बघतो ‘ त्या बहाद्दराने २ नं गेटवर कॉल करून गाडी अडवायला सांगितली. तिथेही थांबलो. जसे काही अतिरेकी पकडल्यागत सगळे अंगावर आले. मग मी त्यांना तुम्ही सगळ्यांना याच चौकशीतून सोडता का असा सवाल केला. मग त्यांची गडबड झाल. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मला घेऊन गेले. मला अस वाटलं की अरे मी बॉर्डर तर पार नाही केली ना, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे गेल्यावर पुन्हा प्रोडक्शनला कॉल लावून दिला. मग सगळे सारवासारव करायला लागले, पण मी त्या अधिकाऱ्याला ठणकावून सांगितले की साहेब तुम्हाला बदलीचा पिरेड असतो. पण कला दिग्दर्शकामुळेच या चित्रनगरीला महत्व आहे. आम्ही कायमच येत असतो. तर यावर चांगला तोडगा काढला पाहिजे. सर्वांना एकसारखे नियम,, नाहीतर कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे. यात माझा एक तास वेळ विनाकारण वाया गेला सोबत व्हिडीओ share करत आहे’.
या प्रकारानंतर महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर व अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्या नेतृत्वाखाली निर्माता, दिग्दर्शक व महामंडळाच्या संचालकांनी गोरेगाव फिल्मसिटीसमोर आंदोलन केले. शिवाय फिल्मसिटीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना महामंडळाचे ओळखपत्र असलेल्या सभासद, कलाकार, तंत्रज्ञांना गोरेगाव फिल्मसिटीत प्रवेश देण्याविषयी चर्चा केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्य ओळखपत्रावर गोरेगाव फिल्मसिटीत प्रवेश दिला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.