हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. देशभरात आजच्या दिवसानिमित्त कायमच उत्साहाचं वातावरण पहायला मिळतं. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आजकल हा दिवस साजरा करण्याचे स्वरूप फारच आधुनिक झाले आहे. अत्यंत अनपेक्षित पद्धतीने झालेले हे बदल प्रत्येकाला रूचतीलच असं नाही. दरम्यान याबाबत एका मराठी दिग्दर्शकाने त्याच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे आपलं मत मांडलं आहे. ‘उंच माझा झोका’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेले दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी यासंदर्भात शेअर केलेली फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.
विरेंद्र प्रधान यांनी हि पोस्ट शेअर करताना लिहिलंय, ‘सुंदर प्रसन्न असे रामराज्य आणि त्यात आज प्रजासत्ताक दिनाची छान पहाट. ही एक नवी संस्कृती जी आपल्याकडे रुजायला लागली आहे त्याने डोळे भरून आलेत. कान तृप्त झालेत. प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे, जोरजोरात डीजे लागले आहेत. बायका आणि पुरुष जोरजोरात इंग्रजीमध्ये भाषण करत आहेत. जोरजोरात इंग्रजी- हिंदी गाण्यांची मैफील जमली आहे. त्यावर काही बायका चमच्यात लिंबू ठेऊन धावत आहेत. लहान मुले आपल्या आयांना धावताना पाहून चित्कार करत आहेत. इंग्रजी आणि हिंदीचा सुरेल मिलाफ आणि त्यावर डीजेचा तडका, त्यात आपल्या रामराज्यात सुरेल प्रजासत्ताक पहाट, तोंडात चमचा लिंबू, पायात रश्या बांधून धावणे, समोसा ढोकळ्यावर आडवा हात असे हे बहारदार इंग्रजी राज्याच्या सीमा रेषेवर पोहोचलेली आपली स्वतःची, उदयास येत चाललेली संस्कृती पाहून डोळ्यांत पाणी उभे राहीले आहे’.
‘तुम्ही म्हणाल डोळ्यात पाणी उभे कसे राहीले? तर… हा एक कोणीतरी असाच बाजूला उभा आहे. शांत. समृद्ध. अमर्याद अस्तित्व असलेला. दुर्लक्षित वगैरे अजिबात नाही हा. देशात, रामराज्यात याचा सन्मान, वंदन आणि अभिमान, प्रेम खऱ्या अर्थी दर्शवणारे करोडो आहेत. म्हणून तो अजून डौलात उभा आहे. हवेच्या लहरींवर फडफडतो आहे. पण मग ही कोण माणसे आहेत..? रामराज्यातल्या मुलांना किती सुंदर भवितव्य देतायत. मन भरुन आले हो!! प्रजासत्ताक दिनाच्या खुप शुभेच्छा!!!’ विरेंद्र प्रधान यांच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे आणि हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.