‘सून सासूला चावते.. रक्त पिपासू सासू..’; मालिकांच्या TRP रेसबाबत मराठी दिग्दर्शकाची परखड पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मालिका बंद झाल्या. ज्याचे कारण होते कमी टीआरपी. यातील बऱ्याच मालिका काही महिन्यांत, काही दिवसांतच गुंडाळल्या गेल्या. कथानक दर्जा असूनही या मालिका पुढे चालू ठेवल्या गेल्या नाहीत. ज्यामुळे मालिकेच्या सेटवर काम करणाऱ्या अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान आघाडीच्या मराठी वाहिन्यांमध्ये कायम टीआरपीसाठी चढाओढ सुरू असते. ज्यावरून प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी आता अत्यंत रोखठोक आणि परखड अशी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा उदाहरण म्हणून वापर केला आहे.

दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी छोट्या पडद्यावरील ‘उंच माझा झोका’, ‘राधा ही बावरी’, ‘स्वामिनी’, ‘यशोदा’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. विरेंद्र सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. दरम्यान त्यांनी मालिकांच्या टीआरपीबाबत शेअर केलेली ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते आहे. आपल्या पोस्टमध्ये विरेंद्र प्रधान यांनी लिहिले कि, ‘माझ्या नवीन मालिका : रणबीर कपूरने ‘अ‍ॅनिमल’च्या आधी खूप छान सिनेमे केले ते चालले नाहीत. फ्लॉप झाले.. मग त्याने ‘अ‍ॅनिमल’ केला अन् सुपरहिट झाला. राज कपूरने ‘मेरा नाम जोकर’ केला. फ्लॉप झाला… मग त्याने बॉबी बनवला… सुपरहिट झाला’.

‘मी ”उंच माझा झोका”, ”स्वामिनी”, ”संत ज्ञानेश्वर”, ”यशोदा” या मालिका केल्या नाही चालल्या. (TRP रेसमध्ये) आता मी नवीन मालिका करतोय. काही टायटल्स रजिस्टर केली आहेत.
सून माझी Animal
सासू माझी Animal
सून सासूला चावते
रक्त पिपासू सासू
अजून काही छान नावे सुचली तर नक्की कळवा. TRP सॉलिड आणि भारताचं इकॉनॉमिक्स सुद्धा सुधारेल’. दरम्यान, विरेंद्र प्रधान यांच्या या पोस्टवर अनेकांनी विविध आणि भन्नाट स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. माहितीनुसार, सध्या ते ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ या मालिकेच्या माध्य्मातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.