‘चारचौघी’ फेम अभिनेता अडकला लग्नबेडीत; नाटकाच्या संपूर्ण टीमने लावली होती हजेरी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवर प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ हे नाटक सध्या चांगलं जोरदार सुरू आहे. या नाटकात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर अशी मातब्बर मंडळी काम करत आहेत. आपल्या अभिनयाच्या माध्य्मातून हे कलाकार रंगभूमीवर हे नाटक गाजवत आहेत. प्रेक्षकांचाही नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच या नाटकातील एक अभिनेता लग्नबंधनात अडकल्याचे समोर आले आहे.

‘चारचौघी’ या नाटकातील अभिनेता पार्थ केतकरचा नुकताच शुभविवाह संपन्न झाला. पार्थने मानसी नाटू हिच्याशी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पार्थच्या लग्नासाठी मराठी कलाविश्वात अनेक कलाकार मंडळी हजर होती. शिवाय तो काम करत असलेल्या ‘चारचौघी’ या नाटकाची संपूर्ण टीमदेखील त्याच्या लग्नासाठी उपस्थित राहिली होती. या कलाकारांनी सोशल मीडियावर पार्थच्या लग्नाचे फोटो शेअर करत त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पार्थ केतकरच्या लग्नात अभिनेत्री मुक्ता बर्वे, पर्ण पेठे, कादंबरी कदमसह ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडीदेखील उपस्थित होत्या. पार्थच्या लग्नात या सहकलाकारांनी खास लूक केला होता. प्रत्येकीने सुंदर साडी नेसली होती आणि याचे फोटो पर्ण पेठेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. जे चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान, ‘चारचौघी’ हे मूळ नाटक १९९१ रोजी मराठी रंगभूमीवर सादर झाले. ज्यामध्ये दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, आसावरी जोशी आणि प्रतीक्षा लोणकर मुख्य भूमिकेत होत्या. यानंतर आता पुनरुज्जीवित नाटकात रोहिणी हट्टंगडी, मुक्त बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे मुख्य भूमिकेत आहेत.