पाखरं उडून गेली..!! ‘कुर्रर्रर्र’ नाटकातून 2 महत्वाच्या कलाकारांची एक्झिट; विशाखा सुभेदाराने दिली महत्वाची माहिती


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रंगभूमीवर प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘कुर्रर्रर्र’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या नाटकात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि पंढरीनाथ कांबळे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले. पण नव्या अपडेटनुसार, या नाटकातून नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर यांनी एक्झिट घेतली आहे. याबाबत स्वतः अभिनेत्री विशाखा सुभेदारने माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने ‘कुर्रर्रर्र’ नाटकात नव्या कलाकारांची एंट्री झाल्याचे सांगितले आहे.

अभिनेत्री विशाखा सुभेदारने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘Show must go on.. कलाकारांना उत्तम संधी मिळायलाच हवी.. त्यांनी मोठं होणं हा कलेचा वारसा जपण्यासारखं आहे.. पण तरीही एखादी कलाकृती तीच नशीब घेवून येते.. बाकी आम्ही सगळे निम्मित मात्र. काही पाखरं भरारी मारायला उडून गेली.. हरकत नाही पण show must go on.. काही प्रिय मित्रांना हाक मारली त्यांनी साथ दिली म्हणून प्रयोग सुरुळीत ठेवता येत आहेत. माझ्या हाकेला धावून आलेला माझा मित्रसखा प्रियदर्शन जाधव.. आणि मैत्रसखी मयुरा रानडे…! मित्रानो तुमच्या साथीसाठी आभार आणि नाटकासाठी.., नाटक सुरु राहायला हवं म्हणून त्याची ही धडपड.. हे वखाणण्याजोगी आहे’.

‘तर मंडळी हाच बदल आहे.. नाटक.. कुर्रर्रर्रर्र कलाकार.. पॅडी कांबळे, प्रियदर्शन जाधव, मयुरा रानडे, विशाखा सुभेदार. आत्तापर्यंत तुम्ही नाटकावर प्रेम केलात त्याबद्दल तुमचे आभार.. पण ह्यापुढे ही कायम सोबत रहा.. नाटक बघायला या, आणि बघीयल आवळा तरीही वेगळ्या संचाच नाटक बघायला या.. खात्री आहे.. नाटक जगवणाऱ्या कलाकारांचं कौतुक करायला नक्की याल’. या माहितीनुसार, विशाखा सुभेदार निर्मित या नाटकात नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर या दोन कलाकारांऐवजी प्रियदर्शन जाधव आणि मयुरा रानडे हे दोन कलाकार आपल्या भेटीस येणार आहेत.