‘फक्त एक दिवस बाकी…’; अ‍ॅक्शनचा तडका घेऊन येतोय दमदार ‘अंकुश’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून सुप्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले ‘अंकुश’ चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला दीपराज ‘अंकुश’ या बिगबजेट अॅक्शन- थ्रीलरपटातून पदार्पण करत आहे. तर गायिका केतकी माटेगांवकर या चित्रपटातून एका वेगळ्याच आणि बोल्ड भूमिकेत आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी केवळ एक दिवस बाकी असून प्रेक्षकांमध्ये कथानकाविषयी मोठी उत्सुकता आहे.

अ‍ॅक्शनचा दमदार तडका असलेला ‘अंकुश’ हा बहुचर्चित चित्रपट उद्या शुक्रवारी, ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कथानकाला प्रेमकथेची जोड असे काहीसे या चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी चित्रपटाविषयी उत्सुकता देखील व्यक्त केली होती. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे माजी मंत्री तसेच परतुर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला होता.

https://www.instagram.com/reel/Cxp1K5HKU4R/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

सामान्य कुटुंबातील सामान्य तरुण आणि त्याच्या आयुष्यात आलेली तरुणी मग कॉलेज जीवनात उमलणारं प्रेम अन काहीतरी करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणासमोर आलेला राजकारणाचा डाव असे थरार निर्माण करणारे कथानक घेऊन ‘अंकुश’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची आहे. तर दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांचे आहे. चित्रपटात केतकी माटेगावकर, स्वप्नदीप घुले, सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर, मंगेश देसाई, ऋतुजा बागवे, शशांक शेंडे, गौरव मोरे, नागेश भोसले, पूजा नायक अशी दमदार स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.