स्त्रीभ्रूण हत्येवर भाष्य करणारा ‘Y’ चित्रपट येतोय टीव्हीवर; जाणून घ्या कधी..? कुठे..? पाहता येणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका स्त्रीसाठी आई होणं ही जगातील सर्वोत्तम बाब असते. तिच्या आयुष्यातील हे असं सुख आहे ज्या सुखावर तिचा पूर्ण हक्क आहे. स्त्रीच्या गर्भात वाढणारं मुलं स्वतः मोठं होत असताना तिच्यातलं आईपण जागवत असतं. त्यामुळे आई आणि मुलाची नाळ कायम घट्ट असते. आपल्या देशात ‘मुलीच्या जन्माचे स्वागत करा, त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ नका, त्यांना शिकवा आणि सक्षम बनवा’ याबाबत जनजागृती मोहीम राबवली जात आहे. हाच विचार ‘वाय’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर घेऊन आला आणि हा सिनेमा आता टीव्हीवर पाहता येणार आहे.

‘वाय’ हा चित्रपट येत्या २४ डिसेंबर २०२३ रोजी म्हणजेच उद्या रविवारी झी टॉकीजवर पाहता येणार आहे. दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता या चित्रपटाचे प्रसारण होणार आहे. या निमित्ताने एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. ज्यामध्ये ‘मुलीला जन्म द्या’ हा सुंदर संदेश देऊ केला आहे. मुळात ‘वाय’ हा चित्रपट ‘स्त्रीभ्रूण हत्या’ या गंभीर विषयावर बेतलेला आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने हे नवं गाणं तयार करण्यात आलंय. स्त्रीभ्रूण हत्या हा आजच्या काळातील गंभीर प्रश्न आहे. ज्यामध्ये अनेक महिला आणि जन्माला न आलेलं स्त्री भ्रूण भरडलं जात आहे.

देशाने प्रगती केली, विकास झाला, शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या मात्र आजही अनेक भागात अनेक समाजात ‘ती मुलगी आहे म्हणून नको…’ हि खोलवर रुजलेली समज संपलेली नाही. ‘मुलगी झाली..’ सांगताना पालकांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हे तर दुःखाची भावना दिसते. पहिली मुलगी असेल तर दुसरा मुलगा हवा हा हट्ट दुसऱ्यावेळी छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान करण्यास जबाबदार ठरतो. यामुळे मुलीचा गर्भ असल्याचं समजताच तिचा गर्भातच जीव घेतला जातो. नाहीतर मुलगी जन्माला आलीच तर तिला कचऱ्याच्या पेटीत, रेल्वे रुळावर, नदीत मरायला फेकून दिले जाते वा अनाथाश्रमाच्या पायरीवर सोडले जाते. परिणामी मुलींचे समाजातील प्रमाण घटत चालले आहे.

अभिनेत्री मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी तसेच अभिनेता नंदू माधव, संदीप पाठक या कलाकारांच्या अभिनयातून साकारलेला ‘वाय’ हा चित्रपट स्त्रीभ्रूण हत्या, गर्भलिंग निदान करणारी वैद्यकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील होणारे आर्थिक गैरव्यवहार आणि सांकेतिक भाषा यावर परखडपणे भाष्य करतोय. या सिनेमाच्या माध्यमातून मुलगी म्हणजे काय असते..? हे सांगणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘तुझा माझा, माझा तुझा श्वास ग एक.. गोजिरी किती माय साजिरी लेक’ असे या गाण्याचे बोल आहेत आणि सायली खरे यांच्या संगीतातून व आवाजातून हे गाणं साकारलं आहे. जे नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडणार आहे