बॉलिवूड अभिनेत्रीने सादर केले मराठी बडबडगीत; Video झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने प्रकृती अस्वास्थ्यामुळे कामातून ब्रेक घेतला आहे. असे असले तरीही सोशल मीडियावर मात्र तिची चर्चा कायम आहे. काही महिन्यांपूर्वी अदाचा मराठी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हिंदी भाषिक असूनही तिचं मराठी चांगलं असल्यामुळे तिच्या व्हिडीओने सगळेच प्रभावित झाले. दरम्यान ‘एक होती इडली, ती होती चिडली’, ‘अटक मटक चवळी चटक’ अशा काही बडबडगीतांचे तिने सादरीकरण करतानाचे व्हिडिओदेखील शेअर केले होते. जे नेटकऱ्यांना इतके आवडले कि त्यांनी आणखी काही व्हिडिओंची डिमांड केली. मग काय अदाने ही डिमांड पूर्ण केली आहे.

अदाने अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती म्हणतेय, ‘आज मी अजून एक शाळेत शिकलेली एक मराठी कविता ऐकवते. ओके. ही कविता मी लिहलेली नाही आणि मी कुणाला फॅट शेम आणि बॉडी शेम पण करत नाही’. अदाने ‘जाड्या आणि रड्या’ असे कवितेचे शीर्षक सांगत पुढे कविता म्हणायला सुरुवात केली. या कवितेचे बोल पुढीलप्रमाणे,
‘जाड्या रड्या दुक्कल छान, होती मोठी अक्कलवान।
जाड्या केव्हढा अगडबंब, रड्या किडमिड्या नुसता शुंभ।।

एकेदिवशी त्यांना भेटला, चकणा डॉक्टर कोण कुठला।
ऐटीत दाखवून छातीवरचा बिल्ला, त्याने दिला फुकट सल्ला।।

जाड्या करता उठाबसा व्यायाम आणि रड्या करता काजू नि बदाम।
जाड्याशी बोलताना रड्याकडे पाहिले आणि रड्याशी बोलताना जाड्याकडे पाहिले।
जाड्या आणखीच जाड्या झाला.. रड्या आणखीच रड्या बनला।

हि कविता बोलून झाल्यानंतर तिने ‘कसं वाटलं…?’ असंही अगदी गोंड अंदाजात विचारलं आहे. या व्हिडिओत अदाने हिरव्या रंगाची मराठमोळी नऊवारी साडी परिधान केल्याचे दिसत आहे. सोबत मराठमोळ्या लुकसह तिने हि कविता मराठीतून अत्यंत गोड शैलीत म्हटली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी तिच्या मराठी बोलण्याचे प्रशंसा केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेत आला आहे. अनेकांना अदा इतकी छान मराठी बोलते यावर विश्वास बसत नाहीये. तर काहींनी तिला मराठी चित्रपटात काम कर असे म्हटले आहे.