‘अभ्यंगस्नान, नवे कपडे, चविष्ट फराळ..’; प्रेक्षकांच्या लाडक्या परीने ‘अशी’ साजरी केली दिवाळी पहाट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिकाविश्वात ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने अत्यंत लोकप्रियता मिळवली. हि मालिका जरी संपली असली तरी यातून घराघरात पोहोचलेल्या परीने म्हणजेच बालकलाकार मायरा वैकुळने प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केलं आहे. मायराने साकारलेली परी अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. शिवाय मायरा सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे प्रचंड फॉलोवर्स आहेत. आता नुकताच मायराने दिवाळीनिमित्त शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दिवाळीत नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. त्यानुसार तेल आणि सुगंधी उटणं लावून अभ्यंगस्नान केले जाते. तर यंदा मायराने उटणं लावून अभ्यंगस्नान करीत छान कपडे परिधान करून दिवाळी पहाट साजरी केली. ज्याचा व्हिडीओ मायराच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, सुरुवातीला मायराला तिची आई उटणं लावताना दिसते. त्यानंतर अभ्यंगस्नान करून तिचे औक्षण केले जाते.

यानंतर मायरा दिवाळीच्या फराळाचा आनंद घेताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मायराच्या या गोड व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देताना तिला दिवाळीच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. दरम्यान, मायराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मराठी मालिकेत आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केले. कलर्स टीव्हीवरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत तीने काम्या पंजाबी आणि स्नेहा वाघसोबत मुख्य भूमिका साकारली होती.