‘आयुष्यात काही योगायोग फार विचित्र…’; मेघा घाडगेची ‘ती’ पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचे ‘हास्यसम्राट’ आणि सर्वांचे लाडके लक्षा मामा म्हणजेच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रत्येक माध्यमात प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिका, चित्रपट, नाटक अशा वेगवेगळ्या माध्यमातून लक्षा मामांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालत आहेत. त्यामुळे प्रत्येक वयोगटात त्यांचा चाहता वर्ग आहे. आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट रिमोट हातात न घेता टीव्हीवर पाहिले जातात. अशा लाडक्या अभिनेत्याचा ६९वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान अभिनेत्री मेघा घाडगेने शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

अभिनेत्री मेघा घाडगे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘आयुष्यात काही योगायोग फार विचित्र असतात… आज लक्ष्या मामांचा बर्थडे!! खरंतर आजही, जवळजवळ १९ वर्षानंतर वाटत राहतं, अचानक लक्ष्या मामांचा फोन येईल आणि ते ओरडून म्हणतील, ”महेशला (महेश कोठारे) कॉल कर आत्ताच्या आत्ता..” माझ्या आयुष्यातला पहिला रिलिज्ड सिनेमा आणि ”द लक्ष्मीकांत बेर्डे” यांचा शेवटचा रिलिज्ड सिनेमा एकच असणं याचं शल्य काय असू शकतं, याची कल्पना कुणालाही असण्याची शक्यता नाही’.

पुढे लिहिलंय, ‘लहानपणी ज्यांचं कॉमेडी टायमिंग पाहून मी मोठे झाले, ज्यांचं इम्प्रोव्हायजेशन आजही अचाट करणारे वाटतात आणि मुळात ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला आणि भारताला खळखळून हसवलं त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव हा, कलेच्या प्रांगणातला एक समृद्ध अनुभव होता. हॅप्पी बर्थडे लक्ष्या मामा! We all miss you… तुमच्या अजरामर कामांतून, कलाकृतींमधून, अफाट परफॉर्मन्स मधून तुम्ही आजही आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात Alive आहात!!!’ मेघा घाडगेची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.