प्रियदर्शनीच्या गावी पोहोचले जत्रेकरी; गावच्या शेतात मारला फेरफटका अन केली धमाल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले आहेत. ज्यामध्ये वनिता खरात, ओंकार राऊत, रोहित माने, प्रियदर्शनी इंदलकर यांसारखे अनेक कलाकार आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील सर्व कलाकार मंडळी सुट्टीवर आहेत. त्यामुळे जो तो मस्त आपलं व्हॅकेशन एन्जॉय करतोय. दरम्यान हि सर्व जत्रेकरी मंडळी प्रियदर्शनी इंदलकरच्या गावी गेले आहेत. यावेळी त्यांनी केलेली धमाल एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रकाशझोतात आलेली वनी म्हणजेच अभिनेत्री वनिता खरातने काही दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याबरोबर ‘सुमीतवनी’ नावाचे युट्यूब चॅनेल सुरु केले होते. यावर वनिता तिच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करताना दिसते. दोन दिवसांपूर्वीच या युट्यूब चॅनेलवर वनिताने ‘प्रियदर्शनी इंदलकरच्या गावच्या शेताची सफर’ असे शीर्षक देऊन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी प्रियदर्शनीच्या गावी MHJ फेम प्रियदर्शनी इंदलकर, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात, ओंकार राऊत हे कलाकार आणि यांच्यासह वनिताचा नवरा सुमीत लोंढेदेखील गेले होते.

प्रियदर्शनीच्या गावी या कलाकारांनी मस्त रानात फेरफटका मारला. शेतात शेंगा काढल्या आणि एकंदरच केलेली मजा त्यांनी या व्हिडिओत दाखवली आहे. प्रिदर्शनीच्या कुटुंबीयांनी शेतात डाळिंब, आंबा, शेंगा अशी विविध पिके घेतली आहेत. विशेष म्हणजे प्रियदर्शनीच्या वडिलांनी त्यांच्या घरातून खंडोबाचे मंदिर कसे दिसते हे या व्हिडिओत दाखवले आहे. या व्हिडिओत वनिता म्हणाली, ‘हास्यजत्रेतील इतर कलाकारांना कामानिमित्त वेळ नसल्याने सर्वांना प्रियाच्या गावी येणे शक्य झाले नाही, आम्ही लवकरच एकत्र भेटू’. व्हिडीओच्या शेवटी म्हणाली, ‘तुम्ही सुद्धा प्रियदर्शनीच्या मधुबन फार्म्सला भेट द्या’.