हास्यजत्रेचा गौऱ्या झळकणार हिंदी सिनेमात; पोस्ट शेअर करत म्हणाला..,


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले. यामध्ये अभिनेता गौरव मोरेचा देखील समावेश आहे. उत्तम अभिनय आणि विनोदाचं परफ़ेक्ट टायमिंग यामुळे गौरवला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा’सोबतच तो मराठी चित्रपटातही झळकणार आहे. याशिवाय आता लवकरच एका हिंदी सिनेमातून गौरव प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आता प्रेक्षकांचा लाडका गौऱ्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे टाकत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. या चित्रपटाचे नाव ‘संगी’ असे आहे. या संदर्भात अभिनेत्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गौरवने संगी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. ही व्हिडीओ पोस्ट आहे. यामध्ये गौरव टीमचे आभार मानताना दिसतोय.

यासोबत कॅप्शनमध्ये गौरवने म्हटलंय, ‘मी सर्वांचे मनापासून आभार मानतो की इतक्या चांगल्या टीममुळे मला अशा चांगल्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. शरीफ भाऊ. संजय भाऊ. विद्या मॅडम. आता मी या चित्रपटाचा एक भाग आहे सर्वांनी माझी काळजी घेतली आहे. सुमित कुलकर्णी सरांचे विशेष आभार. या चित्रपटासाठी ज्यांनी माझा विचार केला त्या सर्वांचे मनापासून आभार. संगी लवकरच भेटू’. या सिनेमात गौरवसोबत विद्या मालवडे, संजय बिश्नोई आणि शाकिब हाश्मी हे कलाकार महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तर सुमीत कुलकर्णी दिग्दर्शन करणार आहेत.