हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अनेक हास्यवीर दिले. यांपैकी एक म्हणजे सर्वांचा लाडका सावत्या. अर्थात अस्सल सातारकर अभिनेता रोहित माने. रोहित मानेला हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली आणि तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागला. प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे आणि सोबत लाभलेल्या लोकांच्या पाठिंब्यामुळे आज रोहित मानेने त्याच स्वतःच घर खरेदी करण्याचं पहिलं स्वप्न पूर्ण केलं आहे. याबाबत त्याने एक पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.
प्रत्येकाला वाटत कि, आपलं हक्काचं एक घर असावं. असच स्वप्न रोहित मानेने पाहिलं होत आणि आता मुंबईत त्याने स्वत:च्या हक्काचं पहिलं घर खरेदी करत हे स्वप्न पूर्ण केलं आहे. रोहितने दहिसरमध्ये नवं घर खरेदी केलं असून या पोस्टमध्ये त्याने घराची पहिली किल्ली आणि झलक शेअर केली आहे. एव्हढी वर्षे भाड्याच्या घरात राहिल्यानंतर आता त्याने हक्काचं पहिलं घर खरेदी केलं आहे. हि पोस्ट शेअर करताना रोहितने लिहिलंय, ‘मी साताऱ्यात जन्माला आलो. तिथेच वाढलो. माझे वडील कामानिमित्त मुंबईत असायचे आणि आम्ही गावी. कुटुंबापासून किती दिवस लांब राहायचं म्हणून माझ्या बाबांनी आम्हाला मुंबईत आणलं. लहानपणापासून आम्ही बऱ्याच घरांमध्ये राहिलो, काही घरांमध्ये आवडत नसतानाही नाईलाज म्हणून राहावं लागलं आणि काही घरं खूप आवडत असतानाही नाईलाज म्हणून सोडावी लागली’.
‘त्या सगळ्या प्रवासात एक स्वप्न कायम सोबत असायचं आणि ते म्हणजे स्वतःच हक्काचं घर असावं जे नाईलाज म्हणून सोडावं लागणार नाही आणि मनासारखं सजवता येईल. बरं त्यात निवडलेलं क्षेत्र इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की, कधी घर घेण्याची हिंमतही झाली नाही पण, श्रद्धा तुझ्यासोबत लग्न झालं आणि ज्या हिंमतीने तू सगळं हातात घेतलंस त्यामुळे आणि त्यामुळेच हे शक्य झालं आहे. ही हिंमत आम्हाला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने दिली. आता मी हक्काने सांगू शकतो… होय हे आमचं घर आहे. स्वप्नपूर्तीचा हाच तो अनुभव. ह्या सगळ्यात माझे आई वडील, माझे सासू सासरे, यांनी कायमचं आम्हाला दिलेली साथ मी कधीच विसरु शकणार नाही. तुम्हा सगळ्यांचे आर्शीवाद आणि शुभेच्छा कायम आमच्या सोबत असू द्या. कायम असंच प्रेम करत राहा. या प्रवासात बरोबर असणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. एका स्वप्नाचा प्रवास पूर्ण होतोय पुढच्या स्वप्नांकडे जाण्याचा ध्यास ठेवून…’.