हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आज घराघरांत लोकप्रिय ठरला आहे. या कॉमिक कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे वेडे विनोदवीर दिले आहेत. काही जुने तर काही नवे चेहरे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि त्यांचे झाले. यामध्ये समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, गौरव मोरे, वनिता खरात, दत्तू मोरे, निखिल बने, रसिका वेंगुर्लेकर, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब अशा अनेकांचा समावेश आहे. आता सरत्या वर्षाचा निरोप घेताना ही कलाकार मंडळी आपल्या प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईज घेऊन आले आहेत.
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करता यावं म्हणून लाडक्या ‘सोनी मराठी’ वाहिनीने एक विशेष कार्यक्रम आखला आहे. उद्या ३१ डिसेंबर २०२३ म्हणजेच या वर्षाच्या शेवटच्या दिवशी संपुन दिवस ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील काही गाजलेली स्किट्स प्रेक्षकांना दाखवली जाणार आहेत. शिवाय रात्री ९ वाजता ‘हास्याची नॉनस्टॉप पार्टी’ हा विशेष कार्यक्रम प्रेक्षकांना पहायला मिळेल. त्यामुळे हा ३१ डिसेंबर MHJ सोबत लोटपोट होत प्रेक्षक साजरा करू शकणार आहेत.
सोनी मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर याविषयी माहिती देण्यात आली आहे. एक पोस्ट शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘वर्षभरातील तणावपूर्ण जीवनशैलीतून काही घटका निर्मळ आनंद घेता यावा म्हणून, ”महाराष्ट्राची हास्यजत्रा” वर्षअखेरीस संपूर्ण दिवस आपल्या भेटीस येणार आहे’. यानिमित्ताने वर्षाच्या शेवटच्या दिवशी प्रेक्षकांना आपल्या लाडक्या विनोदवीरांचे गाजलेले स्किट्स पाहता येणार आहेत आणि त्याचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.