‘तुम्ही माझे हिरो आहात…’; वडिलांच्या वाढदिवशी मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते आपल्या कारकिर्दीतील वेगवेगळे किस्से, अनुभव आणि प्रोजेक्ट्सबाबत माहिती देत असतात. शिवाय प्रोफेशनशिवाय पर्सनल आयुष्यातील देखील अनेक गोष्टी ते चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकतीच त्यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी वडिलांच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत.

मिलिंद गवळी यांनी हि पोस्ट शेअर करत लिहिलंय, ‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पा, माझ्या जन्मदात्याचा जन्मदिवस… वय वर्ष ८४ पूर्ण, ८५ मध्ये पदार्पण…३२ ते ३५ वर्षाच्या माणसांची एनर्जी तरुण मुलांना लाजवेल इतकं काम करायची आजही इच्छा आणि क्षमता आहे. महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष पद आजही यशस्वीपणे पार पाडत आहेत. रिटायर झालेले पेन्शनरसाठी आजही झगडत आहेत, त्यांच्या हक्कासाठी, दुसऱ्याचं चांगलं व्हावं, त्याचं कल्याण व्हावं म्हणून सततचा ध्यास, कोणीही त्यांच्याकडे मदत मागावी आणि आपण ती मनापासून मदत करावी, ते ही आनंदाने, त्याला मदत करण्यासाठी मनापासून प्रयत्न करावे, त्या माणसाचं काम पूर्ण होईपर्यंत त्या कामाचा पाठपुरावा करत राहावा, हा तर त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. पोलीस खात्यात काम करत असताना खंडेलवाल कंपनीची एक केस, तब्बल २९ वर्ष लागले त्या केसचा निकाल लागायला. तोपर्यंत सतत कोर्टाची तारीख न चुकता, रिटायर झाल्यानंतर सुद्धा, पुढचे पंधरा वर्षे, त्या केससाठी लढत राहिले. त्या केसाचा आरोपी हा दोषी होईपर्यंत त्या केसा पाठपुरावा त्यांनी केला.

‘शेवटी जज त्यांना म्हणाले की, कुठलाही ऑफिसर रिटायर झाल्यानंतर केस इतकी सातत्याने चालवत नाहीत. दुसऱ्यावर सोपवून निघून जातात. गवळी साहेब तुमची कमाल आहे. ३७ वर्ष प्रामाणिक काम करून पोलीस खात्यातून ते असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून रिटायर झाले. पण त्यानंतर सुद्धा सातत्याने काम करत आहेत. मी रिटायर झालो नाही तर रिटायर्स करणार आहे. जसे गाडीचे टायर चेंज करून ती पुन्हा वेगाने धावायला तयार होते. तसाच मी सुद्धा आता पुन्हा माझ्या कामाला लागणार. आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांचं काम चालूच आहे. आज ते महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत…१६६ फ्लॅट असलेल्या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत, आजही निस्वार्थ काम चालूच आहे. समाजाला , देशाला अशाच माणसांची गरज असते. पप्पा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, माझं ही आयुष्य तुम्हाला लाभो , हीच ईश्वरचरणी प्रार्थना, तुम्ही माझे हिरो आहात’.