हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळी हे मालिकेत निगेटिव्ह पात्र साकारत असले तरीही खऱ्या आयुष्यात मात्र ते अत्यंत सकारात्मक आहेत. दरम्यान मिलिंद गवळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील किस्से, अनुभव आणि विविध प्रसंग ते कायम शब्दांच्या माध्यमातून शेअर करतात. नुकतच एका मुलाखतीत अभिनेते मिलिंद गवळी यांनी खेळपणाने त्यांच्या खऱ्या आयुष्यातील आर्थिक परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
‘माझ्या घराची गोष्ट’ या कार्यक्रमात बोलताना मिलिंद गवळी म्हणाले कि, ‘मुंबईत घर घेणं साधी गोष्ट नाही. इतक्या वर्षांनी मी घर घेतलं पण त्याचे हफ्ते मी आजही भरत आहे. मी एक कलाकार आहे पण तरीही मला कामासाठी धडपड करावी लागते. काम करुन पैसे मिळतील असंही नाही. ही गोष्ट माझ्या सुरुवातीच्या काळातली आहे. माझे बरेच पैसे इंड्रस्ट्रीत अडकून होते. आजपर्यंत ते मिळाले नाही. काहींनी मुद्दामून दिले नाहीत तर काहींनी ते स्वत: तोट्यात गेल्यामुळे दिले नाहीत. पण मी कधीच त्यांच्याजवळ ते मागितले नाहीत’.
पुढे म्हणाले, ‘आज बऱ्याच वेळा माझ्या खिशात पैसे नसतात. कोरोनानंतर सगळं कॅशलेस झालं आहे ते वेगळं पण मागील दोन वर्षे आपण सगळे घरातच होतो तेव्हा कलाकारांचीही बाकिच्यांसारखीच परिस्थिती झालेली. तेव्हाही इएमआयचे हफ्ते चालूच होते. माझा आजही डोंबाऱ्याचा खेळ चालूच आहे. तसा प्रत्येक कलाकाराचा हा खेळ चालूच असतो. तो कधीही थांबणार नाही’.