‘वाचाल तर च वाचाल…’; मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवरील पुस्तकाचं दुकान पाहून भारावले मिलिंद गवळी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या कार्यक्रमात अनिरुद्ध हे नकारात्मक पात्र साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. वेगवेगळे किस्से, अनुभव आणि विविध विषयांवरील त्यांच्या पोस्ट कायम चर्चेत असतात. नुकताच त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर असलेल्या एका पुस्तकांच्या दुकानात गेल्याचे दिसत आहेत. यानिमित्त त्यांनी स्वतःच्या वाचनाच्या अनुभवाविषयी सांगताना एक पोस्ट शेअर केली आहे.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, ‘डिग्रीसाठी अभ्यास करत असताना अनेक ग्रंथालयांशी माझा संबंध आला. मुंबईतल्या अतिशय सुंदर सुंदर ग्रंथालयांमध्ये मला अभ्यास करायला मिळालं. त्यात आमच्या लाला लजपतराय कॉलेजच्या ग्रंथालयात मी भरपूर तास बसलो आहे. त्यानंतर बॉम्बे युनिव्हर्सिटीची फोर्टला असलेलं डेव्हिड ससून ग्रंथालय इथे बसून पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास केला. ब्रिटिश ग्रंथालयाला फिल्म्स बघायला मिळायचे म्हणून ब्रिटिश ग्रंथालय, अमेरिकन ग्रंथालय पण त्याच कारणासाठी जॉईन केलं. पण दुर्दैवानं माझं वाचन डिग्री मिळवण्यापुरताच सीमित होतं’.

‘या सिनेमाच्या क्षेत्रात आल्यानंतर असंख्य महान लेखकांच्या सानिध्यात यायचा योग आला होता. जसे रत्नाकर मतकरी , कमलाकर नाडकर्णी, सुहास शिरवळकर इत्यादी. पण तेव्हाही मला वाचनाचे महत्त्व कळलं नाही. कलाकार ज्यांचं दांडगा वाचन आहे, जसे मकरंद अनासपुरे, अतुल परसुरे, आता सध्या ‘आई कुठे काय करते‘ या मालिकेत ओमकार गोवर्धन, या कलाकारांचा आणि यांच्यासारखे अनेक कलाकारांचा वाचन हे एक त्यांच्या जीवनाचा भाग आहे. आणि मला खरंच हेवा वाटतो या सगळ्याचा , कलाकार म्हणून ज्या ज्या वेळेला मी कमी पडतो, त्या त्या वेळेला मला जाणवत राहत की वाचन कमी पडलं, भाषेवर प्रभुत्व नाही. ही सतत जाणीव होत असते की शालेय जीवनापासून लहानपणापासून वाचनाची गोडी असणं किती आवश्यक आहे. खरंच ‘वाचाल तर च वाचाल’.

‘मला असं वाटतं यश मिळवण्यासाठी वाचन हे फार महत्त्वाचा आहे. आपल्या देशामध्ये अमिताभ बच्चन, धनुष, नाना पाटेकर, तर जगामध्ये बिल गेट्स, वरण बफेट, ओप्राविनफ्री, बराक ओबामा या सगळ्यांना वाचनाची अतिशय आवड आणि यांचं दांडगं वाचन आहे. याचाच अर्थ कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला यश मिळवायचं असेल, आयुष्य समृद्ध करायच असेल, वाचनाची गोडी निर्माण करणं आवश्यक आहे. खास करून लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करायलाच हवी आणि ती निर्माण करायची जबाबदारी आपलीच आहे. काही गोष्टी मला आयुष्यामध्ये खूप उशिरा कळल्या. पण ठीक आहे ‘देर आये दुरुस्त आये.’