हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळी सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे विविध पोस्टच्या माध्यमातून ते सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. नुकतंच त्यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिर पाठारे यांच्या ‘महाराज’ हॉटेलला भेट दिली होती. यावेळी त्यांनी मिहीरच्या हातची पावभाजी खाल्ली आणि त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळी यांनी हि खास पोस्ट शेअर करताना लिहिलं, ‘महाराज हॉटेल, सुप्रिया पाठारे यांचा चिरंजीव मिहीर यांनी ठाण्यामध्ये महाराज नावाचं एक हॉटेल सुरू केला आहे. स्टार प्रवाहच्या दिवाळी सोहळ्यामध्ये माझी आणि सुप्रियाची भेट झाली, तेव्हा मला तिच्याकडून कळलं की मिहीरने हॉटेल सुरू केला आहे. मी मिहीरला अगदी लहानपणापासून ओळखतो. मिहीरला शेफ व्हायचं होतं हे त्यांनी फार पूर्वीच आपल्या आई- वडिलांना सांगितलं होतं. मधल्या काळामध्ये त्यांनी एक फूड ट्रक सुरू केला होता आणि आता त्यांनी महाराज नावाचं हॉटेल. passion, जिद्द, आवड या गोष्टी यशस्वी होण्यासाठी मुलांमध्ये हव्या असतात. मिहीरमध्ये शेफ बनण्याचं passion ते फॅशन मला परवा प्रत्यक्षात पाहायला मिळालं, ज्यावेळेला त्याच्या हॉटेलला जेवणासाठी गेलो होतो. तो स्वतः पावभाजी बनवत होता आणि ते बनवत असताना तो त्यामध्ये रमला होता. अगदी मन लावून तो ती पावभाजी बनवत होता’.
‘मला आणि दीपाला पाहिल्यानंतर तो म्हणाला मामा तुम्ही बसा मी तुम्हाला स्पेशल हरियाली पावभाजी खायला घालतो. त्याने आम्हाला अतिशय चविष्ट पद्धतीच्या दोन वेगवेगळ्या पावभाज्या खाऊ घातल्या. त्यानंतर मस्त तवा पुलाव. थोड्या वेळाने सुप्रिया हॉटेलमध्ये आली. आम्ही गप्पा मारत बसलो पण माझं लक्ष मिहीरकडे होतं. तो अगदी एकाग्रतेने त्याचं काम करत होता. विराट कोहली, तेंडुलकर कसं मन लावून त्यांचा तो खेळ खेळत असतात तसाच मिहीर त्याच्या आवडीचा खेळ खेळत होता. चविष्ट चवदार पदार्थ बनवून लोकांना खाऊ घालत होता. खरंच मला अभिमान वाटतो मिहीरसारख्या मुलांचा. तो त्याचं पॅशन जोपासतोय, कष्ट करतोय, आई- वडिलांना अभिमान वाटेल असं काहीतरी करतोय’.
‘जेव्हा आपण आजूबाजूला त्याच्याच वयाचे त्याच्या पिढीतले मुलं, आई बापाच्या जीवावर नुसती मजा करताना पाहतो, स्वतःची काम सोडून अभ्यास सोडून वर्ल्ड कपच्या मॅचेसमध्ये रमलेले पाहतो आणि महत्त्वाचं म्हणजे एक मराठी मुलगा बिझनेस करतोय, धंद्यामध्ये उतरला आहे, हीच यशाची पहिली पायरी आहे आणि खरंच मी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो की भारतभर महाराज हॉटेलच्या शाखा उघडू देत. मिहीरला आणि त्याच्या या नवीन व्यवसायाला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा… यशस्वी भव आणि तुम्ही ठाण्यात असाल, डॉक्टर काशिनाथ घाणेकर सभागृहाच्या परिसरात असाल आणि पावभाजी खायची इच्छा झाली तर नक्की मिहीरच्या हॉटेल महाराजला भेट द्या..’. मिलिंद गवळींची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.