अवधूत गुप्तेंना खुपतेय ‘माकडचेष्टा’; Video शेअर करत म्हणाले, ‘हा हुप्प्या.. आता असह्य झाला आहे’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि चित्रपट दिग्दर्शक अवधूत गुप्ते हे सध्या त्यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कमाल मुलाखतीच्या कार्यक्रमामुळे चांगलेच चर्चेत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी या सिजनमध्ये दिग्गज राजकीय नेतेमंडळींची मुलाखत घेतली आहे. यात गुप्तेंनी जनतेला नेमकं काय खुपतंय ते सांगितलं. अशातच आता त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये गुप्तेंनी त्यांना काय खुपतं ते सांगितलं आहे.

अवधूतने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘अहो गुप्ते .. तुम्हाला काय खुपते? तर सध्या आम्हाला दररोज सकाळी उठून बघायला मिळणारी एक “माकड चेष्टा” खुपते!! व्हिडिओमध्ये दिसणारी ही माझी आई. हीचंच आम्ही दोन वर्षांपूर्वी लंग ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलंय. तर, तिच्या नाकावर टिच्चून घरात येऊन केळी पळवणारा (पळवणारा कुठला.. तिथेच बसून खाणारा!) आणि तिच्याच अंगावर धावून जाणारा हा हुप्प्या बघा! माकडांचा त्रास आमच्या बोरिवलीतल्या श्रीकृष्ण नगर मधल्या प्रत्येक रहिवाशाला आता असह्य झाला आहे! अनेकांनी वनखात्याकडे तक्रार देखील केली आहे. वनखाते देखील काही उपाययोजनांचा विचार नक्कीच करत असेल, ह्याची मला खात्री आहे’.

‘‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान‘ हे बाजूलाच असल्यामुळे, विविध पक्षी- प्राण्यांच्या भेटी हे खरंतर आमच्या श्रीकृष्णनगरचे आभूषण. आम्ही हे वर्षानुवर्षांपासून मिरवत देखील आलो आहोत. पण, माकडांचा त्रास हा कोरोना पश्चात कित्येक पटींनी वाढला आहे, हे मात्र खरं! .. आणि ह्याचं खरं कारण म्हणजे “त्याआधी वर्षानुवर्षे उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी ह्याच माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज्! ही माकडं पिढ्यानपिढ्यापासून आता ‘शंभर टक्केच्या वन्य जीवनाला‘ मुकली आहेत. झाडावर राहतात, तरी टाकीवरच्या पत्र्याखाली झोपतात. आमच्याच झाडावरच्या तुत्या, जाम, आंबे, पेरू वगैरे फळे काढून खातात सुद्धा. पण, ते केवळ हौसे खातर! बाकी.. सकाळी घरांच्या खिडक्यातून चपात्या लाटण्याचे आवाज आणि फोडण्यांचा वास सुटला, की खिडकीच्या जाळ्यांवर येऊन ओरडा आरडा करून हक्काने हे सर्व पदार्थ मागतात’.

‘माकडं यायची. कोरोना आधी सुद्धा यायची. पण, महिन्या- दोन महिन्यातून चुकून भरकटत आलेली अशी. कोरोना काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना जायची परवानगी बंद झाली आणि त्याबरोबरच बंद झाला ह्या माकडांचा खुराक. मग ह्या वेळेस तो खुराक शोधत ती इथे आली आणि मग इथलीच झाली. आता ती इथेच राहतात आणि छळतात! बाकी स्ट्रगल चालूच राहील.. फक्त ह्यापुढे तुम्ही कुठेही फिरायला गेलात आणि माकड दिसल्यावर त्यांना काही बाही खाऊ द्यायला तुमचा हात किंवा मुलं पुढे सरसावलीच.. तर हा व्हिडिओ नक्की आठवा! एवढेच काय ते.. शुभ दिवस’! अवधूतने शेअर केलेला हा व्हिडीओ आणि अनुभव सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.