‘क्लब 52’चा नवा प्लेयर; कधी काळचा ज्युनिअर आर्टिस्ट आज साकारतोय महत्वाची भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या “क्लब 52” या चित्रपटातील अभिनेता भरत ठाकूरनं या टॅगलाइनचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून सुरुवात करून महत्त्वाच्या भूमिकेपर्यंतचा प्रवास भरतनं केला आहे. “क्लब 52” हा चित्रपट १५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे.

‘अभिनय करण्याव्यतिरिक्त मनोरंजन क्षेत्राविषयी मला काहीच माहिती नव्हती. एका मित्रानं मला ज्युनिअर आर्टिस्टच्या जगात नेलं. त्यानंतर ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून दोन – तीन वर्षं काम केलं. एक दिवस अचानक “फुलपाखरू” या मालिकेत ज्युनिअर शाहरूख ही भूमिका मिळाली. त्यानंतर मला पुन्हा उत्साह वाटू लागला. “अस्मिता”, “क्राइम पेट्रोल” अशा अनेक मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. आता मला “क्लब 52” या चित्रपटात मला महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. हा चित्रपट माझ्यासाठी मोठा ब्रेक आहे,’ अशी भावना भरतने व्यक्त केली.