‘बाईपण भारी देवा’चे घवघवीत यश!! थिएटरमध्ये पूर्ण केले ब्लॉकबस्टर 50 दिवस; केदार शिंदे म्हणाले, ‘लक्ष्मीच्या पावलांनी..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ६ बहिणींची एक सुंदर लयबद्ध गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडली. या ६ जणी वेगळ्या पण तरीही आपल्यातील एक अशी भावना प्रत्येकीच्या मनात आली आणि ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केली. तुफान प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रचंड प्रेमासह या चित्रपटाने थिएटरमध्ये यशस्वी ५० दिवस पूर्ण केले आहेत. मराठी सिनेविश्वासाठी हि अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा आनंद सोशल मीडियावर व्यक्त करताना केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ‘५० ब्लॉकबस्टर दिवस साजरे करत आहोत’ असे लिहिलेले चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘एखाद्या सिनेमाचे ५० दिवस साजरे होण्याची माझी ही पहिलीच वेळ. या सिनेमाला भरभरून प्रतिसाद रसिकांनी दिला.. त्यातही स्त्रियांनी याला एवढं आपलसं मानलं. लक्ष्मीच्या पावलांनी हे पदरात पडलं’. केदार शिंदेंनी ही पोस्ट शेअर करताच यावर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. अनेक नेटकरी, चाहते तसेच सेलिब्रिटी मंडळींनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब चौधरी या सहा मातब्बर अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसल्या आहेत. साहीजणींनी आपापल्या भूमिका अत्यंत उत्तमरीत्या साकारल्या आहेत. महिला प्रेक्षक वर्गाने हा चित्रपट इतका डोक्यावर उचलून घेतला कि या ५० दिवसात ‘बाईपण भारी देवा’ने ७५.०५ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता सर्वांचे लक्ष हा चित्रपट ‘सैराट’चा १०० कोटींचा विक्रम तोडू शकेल का..? यावर आहे.