‘झिम्मा 2’ सुपरहिट होणार…? प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादासोबत पहिल्याच दिवशी रग्गड कमाई


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ हा चित्रपट अखेर काल प्रदर्शित झाला. गेल्या महिन्याभरापासून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळाली. कोविडनंतर ‘झिम्मा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवला. यानंतर आता ‘झिम्मा २’ची सुरुवात हाऊसफुल्ल शोसोबत झाली आहे. इतकंच काय तर प्रेक्षकांना तुफान प्रतिसादासह या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे.

‘झिम्मा २’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचा मोठा आकडा गाठला आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या मराठी चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर तब्बल १.२० कोटी रुपये इतकी कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी कोट्यवधींचा गल्ला साठवणारा हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार यात काही शंकाच नाही. ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा चित्रपट अनेक रेकॉर्ड तोडताना दिसेल. ‘झिम्मा’च्या पहिल्या भागाने जी जादू दाखवली तीच जादू आता सिक्वलच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे.

‘झिम्मा’च्या पहिल्या भागानेसुद्धा बॉक्स ऑफीस गाजवला होता. यानंतर आता ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफीसवर रग्गड कमावताना दिसतो आहे. कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटात मैत्रिणींच्या रियुनियनची भावस्पर्शी गोष्ट काळजाला हात घालते आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.