हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेली अनेक वर्ष नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून विविध ढंगाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेले अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मनोरंजन विश्वात केलेल्या कामाची दखल घेत त्यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार विठ्ठल उमप फाउंडेशन तर्फे दरवर्षी दिला जातो आणि यंदा दिलीप प्रभावळकर या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
आजवर त्यांनी वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट आणि वेगवेगळ्या ढंगाच्या सकारात्मक, नकारात्मक, विनोदी भूमिका साकारल्या आहेत. ‘झपाटलेला’ चित्रपटातील तात्या विंचू, मुन्नाभाई एमबीबीएस या बॉलिवूड चित्रपटातील महात्मा गांधीजींची भूमिका आणि गंगाधर टिपरे मालिकेतील टिपरे आजोबा अशा अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आपल्या अष्टपैलु अभिनयानं त्यांनी कायम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. त्यामुळे ‘मृदगंध जीवनगौरव’ हा पुरस्कार त्यांच्या आजवरच्या कामाची पोचपावती म्हणायला हरकत नाही.
विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ यंदा डीपीला प्रभावळकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश विठ्ठल उमप यांनी दिली आहे. यंदा १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या २६ नोव्हेंबर २०२३ रोजी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृह येथे सायंकाळी ६.०० वाजता पार पडणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. यावेळी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ‘मृदगंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येईल.