‘मुघलांच्या सात पिढ्यांना दावते, मराठ्यांना नडायचा नतिजा..’; ‘सुभेदार’मध्ये मृण्मयी साकारतेय ‘ही’ दमदार भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवघ्या ५ दिवसांवर ‘सुभेदार’ या चित्रपटाचे प्रदर्शन येऊन ठेपले आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट आहे. घोषणेपासून पोस्टर, टिझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालतो आहे. दरम्यान चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.. हे देखील आता समोर आले आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाच्या भूमिकेचे पोस्टर रिलीज झाले आहे. यामध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा देखील समावेश आहे. ‘सुभेदार’च्या निमित्ताने मृण्मयीच्या पदरी देखील ऐतिहासिक भूमिका आली आहे.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाचे दमदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेची सर्वांना ओळख करुन दिली जात आहे. दरम्यान ‘सुभेदार’मधील मृण्मयी देशपांडेच्या भूमिकेचा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कपाळावर मळवट, त्यावर भलं मोठं कुंकू, नाकात मोत्याची नथ आणि डोळ्यात आग असा मृण्मयीचा दमदार लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘सुभेदार’ या चित्रपटात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘केशर’ ही भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेचे पोस्टर शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘हात बांधून लई मर्द बनतुया…? ह.. हात सोड! मग तुला नाय मुघलांच्या सात पिढ्यांना दावते.. मराठ्यांना नडायचा नतीजा काय असतुया’. या चित्रपटाच्या माध्यमातून मृण्मयी देशपांडे ‘शिवराज अष्टक’मधील तिची गाजलेली ‘केशर’ ही व्यक्तिरेखा पुन्हा एकदा तितक्याच एनर्जीने साकारताना दिसणार आहे.