मुग्धाने सासरी साजरा केला लग्नानंतरचा पहिला उत्सव; आनंदाने म्हणाली, ‘अजून काय हवं..?’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. मुग्धा आणि प्रथमेशचा पारंपरिक विवाह सोहळा चिपळूणमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या साक्षीने दोघांनी सप्तपदी घेतली आणि सुखी संसाराची सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता लग्नानंतर दोघांनी पहिला दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला आहे. जयचा व्हिडीओ मुग्धाने शेअर केला आहे.

लग्नानंतर मुग्धा सासरी चांगली रमली असून खूप आनंदी दिसतेय. सध्या हे नवविवाहित जोडपं प्रथमेशच्या घरी आरवली येथे विसावले आहेत. लग्नानंतरचे विधी, देवदर्शन यांसह दोघांनी मिळून यंदाचा दत्त जयंतीचा उत्सव जंगी साजरा केला आहे. मुग्धाने तिच्या सासरी लग्नानंतरचा पहिला उत्सव साजरा करतानाच एक व्हिडीओ अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलंय, ‘आमच्या लग्नानंतरचा पहिला उत्सव! तोही लाडक्या देवाचा. श्री दत्तजयंती. आरवलीतला घरचा दत्तजयंती उत्सव, एकत्र भजन सेवा. अजून काय हवं!?’

या व्हिडीओत मुग्धा दत्त जयंतीसाठी तयारी करताना दिसतेय. शिवाय मुग्धा आणि प्रथमेश यांनी उत्सवानिमित्त भजन देखीलगायले. दोघांनीही आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडले. व्हिडीओवरून समजतंय की, प्रथमेशच्या घरी दत्तजयंतीच्या उत्सव दणक्यात साजरा केला जातो. मात्र यंदा प्रथमेशने हा उत्सव आपल्या बायकोसोबत साजरा केला आहे. मुग्धाने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. इतकंच नव्हे तर या व्हिडिओवर नेटकरी कमेंट करत कौतुकाचा वर्षाव करत आहेत.