मुग्धा- प्रथमेशचा ग्रहमख विधी संपन्न; सोशल मीडियावर फोटोंनी वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे दोघेही रसिक प्रेक्षकांचे लाडके आहेत. संगीत कलाविश्वात दोघांनीही विशेष प्राविण्य मिळवत स्वतःचे नाव तयार केले आहे. आज दोघेही उत्तम गायनाच्या बळावर अनेक रसिकांच्या कानांना मंत्रमुग्ध करतात. मराठी संगीत कला विश्वातील ही लोकप्रिय जोडी आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा होती. पण आता दोघांच्या घरी लग्नाच्या आधी करायच्या विधींना सुरुवात झाली असून नुकताच त्यांचा ग्रहमख सोहळा पार पडला आहे.

या ग्रहमख सोहळ्याचे विशेष फोटो गायिका मुग्धा वैशंपायनने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मंगल कार्याला नवग्रहांची अनुकूलता मिळवण्यासाठी लग्नापूर्वी ग्रहमख विधी केला जातो आणि नुकताच प्रथमेश- मुग्धाचा हा शूज विधी संपन्न झाला आहे. या सोहळ्यासाठी मुग्धा- प्रथमेशने खास पारंपरिक लूक केला होता. मुग्धाने निळ्या रंगाची पैठणी नेसली होती. तर प्रथमेशने छान शुभ्र जरीकाठाचं सोवळं नेसलं होतं.

मुग्धा आणि प्रथमेशच्या या ग्रहमख विधीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पारंपरिक पद्धतीचे नेटकऱ्यांनी विशेष कौतुक केले आहे. अनेकांनी या फोटोंवर कमेंट करत दोन्ही कुटुंबांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आशीर्वाद दिले आहेत. मुग्धा- प्रथमेशच्या ग्रहमख विधीला कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. दरम्यान, मुग्धाला- प्रथमेशच्या हळदीचा कार्यक्रम देखील अत्यंत साधेपणाने मात्र लक्षवेधी पद्धतीने पार पडला आहे आणि आता लवकर हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.