हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’, ‘अजूनही बरसात आहे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांसाठी लेखिका म्हणून काम करणाऱ्या अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले- रानडे सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. आपल्या लेखणीसह आपल्या अभिनयातून त्यांनी कायम प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सध्या त्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्या ममता हे पात्र साकारताना दिसत आहेत. मालिकांच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयासह त्यांच्या लेखणीची ताकद आपण पाहिलीच आहे. दरम्यान,नुकतीच त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर शेअर केलेली एक पोस्ट प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये त्यांनी ध्वनी प्रदूषणासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.
मुग्धा गोडबोले- रानडे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘गेले कित्येक दिवस म्हणजे जवळपास २०-२५ दिवस आमच्या घराजवळच्या दोन मैदानांवर रोज संध्याकाळी ७ वाजल्यापासून मेळा/जत्रा/ जाहीर कार्यक्रम सुरू आहेत. १०- १०.३० ला संपतात. पण रोज संध्याकाळी ७ ते रात्री १० जे असतं.. तेही त्रासदायकच असतं. माईकवरून भसाड्या आवाजात गाणारे, मोठ्याने लावलेले speakers, अगदी सुंदर मराठी गाणी सुद्धा रोज संध्याकाळी एवढ्या मोठ्या आवाजात का ऐकायची..? आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी का हे महिना महिना सहन करायचं..? आज कसलीतरी जत्रा, उद्या महोत्सव, परवा कुठलातरी प्रादेशिक बाजार, ह्यांचं संपतच नाही. ह्याबद्दल काही बोलायची सोय नाही कारण सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अंतर्गत हे सगळं मोडतं. ह्याच मैदानांवर असंख्य वेळा असंख्य विविध कारणांनी फटाके उडवले जातात. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय रे भाऊ अशी अवस्था आहे’.
पुढे म्हटलंय, ‘उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक बाहेर जातात तसं आता यंदा ह्या लादलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या हंगामात इथून बाहेर कुठेतरी जावं का ह्याचा विचार करावा लागणार. माझ्या पोस्टचा २२ जानेवारीशी काहीही संबंध नाही. मला कोणत्याही प्रकारच्या कर्कश्य ध्वनीचा त्रास होतो. मग तो कोणत्याही निमित्ताने आलेला असला तरी. मी आज हे लिहिलं कारण त्याचा माझ्या कामावर, एकाग्रतेवर आणि मानसिक स्वास्थ्यावर थेट परिणाम होतो आहे, गेले कित्येक दिवस. बाकी ज्यांना त्यातून जे अर्थ काढायचे आहेत त्यांनी ते खुशाल काढावेत. कीव करण्यापलीकडे मी काहीही करू शकत नाही’. मुग्धा यांच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मुग्धा यांनी थेट पोलीस तक्रार करण्याचा सल्लादेखील दिला आहे.