हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसाद ओक हा उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेविश्वात आघाडीवर कार्यरत आहे. प्रसाद ओक अभिनित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेला विक्रम हा थक्क करणारा होता. यानंतर आता प्रेक्षक ‘धर्मवीर भाग २’ची प्रतीक्षा करत आहेत. ‘धर्मवीर’ या चित्रपटातून ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलघडण्यात आला. या भूमिकेत प्रसाद ओकने प्रेक्षकांची मने जिंकली.
धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका परिसरात सुरु केलेल्या नवरात्रोत्सवाची शान ही काही औरच असते. यंदा अष्टमीच्या मुहूर्तावर अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांच्या वेशभूषेत दुर्गदुर्गेश्वरी देवीची महाआरती केली. हा क्षण सर्वांना स्तब्ध करणारा होता. मुख्य म्हणजे या क्षणाचा व्हिडीओ अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी ‘धर्मवीर २- साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाच्या मुहूर्ताचा शॉट शूट करण्यात आला. देवीच्या आरतीचा मान आणि लोकांकडून मिळणारे प्रेम पाहून प्रसाद ओक भारावून गेला होता.
भारावलेल्या प्रसाद ओकने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मा. गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या रुपात आईचं इतक्या जवळून दर्शन मिळणं हे मी माझं परमभाग्य समजतो…!!! काल देवीचे आशीर्वाद घेऊन #धर्मवीर २चा मुहूर्त शॉट घेतला…!!! चित्रीकरण लवकरच सुरु होईल…!!! पहिल्या भागाइतकंच प्रेम आपण दुसऱ्या भागावरही कराल अशी आशा करतो…!!!’ प्रसाद ओकने शेअर केलेला हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत लहान, मोठे आणि अगदी पोलीस बंधू भगिनीसुद्धा प्रसादला दिघेंच्या रूपात पाहून क्षणभर थबकले होते.