Naal 2 Trailer – चैतू, चिमी आणि मणीची गोष्ट येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘नाळ 2’चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Naal 2 Trailer) सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ हा चित्रपट २०१८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले होते. राष्ट्रीय पुरस्कारावरदेखील नाव कोरले. या चित्रपटातून इवल्याशा ‘चैतू’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले. ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तर आता या प्रश्नांची उत्तरे ‘नाळ भाग २’मध्ये मिळणार आहेत.

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘नाळ भाग २’ येत्या दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Naal 2 Trailer)

‘नाळ’मध्ये खऱ्या आईकडे निघालेला चैतू, त्याच्या खऱ्या आईकडे पोहोचणार का..? त्यांच्यातील अबोला दूर होणार का..? याचे उत्तर आपल्याला ‘नाळ भाग २’मध्ये मिळणार आहे. ‘नाळ भाग २’चा ट्रेलर उत्कंठा वाढवणारा आहे. ट्रेलर पाहता हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होणार असल्याचे दिसत आहे. (Naal 2 Trailer) नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात चित्रीकरण स्थळही एक व्यक्तिरेखा साकारत असते. याचा प्रत्यय ‘नाळ भाग २’मध्ये येतोय. ज्याप्रमाणे कलाकार इतक्या ताकदीचे आहेत, तितकेच चित्रीकरण स्थळही महत्वाची भूमिका बजावत आहे. नदी, दऱ्या, डोंगर, घरे असे निसर्गसौंदर्य चित्रपटात अतिशय सुरेखरित्या टिपण्यात आल्याचे दिसत आहे.

Naal 2 Trailer

या ट्रेलरमध्ये चिमुकल्या गोंडस चिमीने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. तिची निरागसता प्रेक्षकांना मोहणारी आहे. ज्याप्रमाणे ‘नाळ’ हा भावनिक, कौटुंबिक चित्रपट होता, तसाच ‘नाळ भाग २’ही आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी म्हणाले, ‘ ”नाळ”ची कथा जिथे थांबते तिथून पुढे ”नाळ भाग २”ची कथा सुरु होते. नात्यांना जोडणारी, घट्ट बांधणारी ही कथा आहे. आम्हाला खात्री आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुमच्यासोबत आमची नाळ जोडली जाणार आहे. (Naal 2 Trailer) ट्रेलर पाहून प्रेक्षकांना कल्पना आली असेलच. त्यामुळे मी मनापासून प्रेक्षकांना सांगतो, हा ‘नाळ भाग २’ चित्रपटगृहात आवर्जून पाहा’.