हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीमध्ये नागराज पोपटराव मंजुळे हे अत्यंत लोकप्रिय, प्रसिद्ध आणि आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. नागराज मंजुळेंनी आजतागायत समाजातील विविध अबोल विषयांची मांडणी अगदी खुलेपणाने केली आहे. विविध विषयांवरील विविध कथानकांवर सिनेमा बनविण्याचे कौशल्य नागराज मंजुळे यांच्याकडे आहे आणि याच जोरावर त्यांनी आजपर्यंत अनेक दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ या सिनेमानंतर आता बाप लेकाच्या अनवट नात्याची तरल कथा घेऊन मंजुळे येत आहेत.
नागराज मंजुळे यांनी कायमच सशक्त कलाकृतींतून सिनेसृष्टीत एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे त्यांचा आगामी चित्रपट ‘बापल्योक’देखील असाच काहीसा वेगळा ठसा उमटवणारा असेल अशी आशा आहे. नागराज मंजुळे यांनी नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माझा मित्र मकरंद मानेनं दिग्दर्शित केलेली, विठ्ठलनं लिहिलेली आणि विजय शिंदेनं निर्माण केलेली ‘बाप ल्योक’ पाहिली.. बापलेकाच्या अनवट नात्याची ही तरल फिल्म मला प्रचंड आवडली. विठ्ठल काळे आणि शशांक शेंडे यांनी लैच मजबूत काम केलंय. ही फिल्म तुम्हीही पहावी असं मनापासून वाटतंय.. सादर करतोय बाप ल्योक… आशा आहे तुम्हाला आवडेल. 25 ऑगस्ट 2023′.
नागराज मंजुळे यांनी हि पोस्ट त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ‘बापल्योक’ हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बाप लेकाचा हृदयस्पर्शी प्रवास मांडला जाणार आहे. या चित्रपटाद्वारे बाप आणि लेकाच्या भावनिक नात्यातील लहान सहान बारकावे मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहेत. नागराज मंजुळे यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये एक चौकनी कुटुंब पहायला मिळत आहे. ज्यात एक मुलगा, त्याचे वडील, आई आणि बहिण दिसतेय. यात ते सर्वजण मुलाकडे कौतुकाने बघत आहेत. या चित्रपटात नेमकी काय गोष्ट दडली आहे ते सिनेमा रिलीजनंतर कळेल.