हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपुर्वी विशाखा सुभेदार निर्मित ‘कुर्ररर’ नाटकातून अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेता प्रसाद खांडेकरने यांनी एक्झिट घेतली. आता त्यांच्या जागी अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि अभिनेत्री मयुरा रानडे दिसत आहेत. दरम्यान हे नाटक रंगभूमीवर तुफान गाजत असताना अचानक नम्रता आणि प्रसादने नाटक का सोडलं..? याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. या चर्चांना पूर्णविराम देताना अलीकडेच प्रसाद खांडेकरने तारखांचे कारण स्पष्ट केले. तर आता अभिनेत्री नम्रता संभेरावने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘कुर्ररर’ नाटकातील एक्झिटबद्दल भाष्य केलं आहे.
नम्रताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिलंय, ‘ ”कुर्रर्रर्र” ह्या नाटकातली माझी भूमिका पूजा I will miss u so much माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचं नाटक. माझी भूमिका मी अक्षरशः जगले. माझ्या आयुष्यातलं अभिनयाचं पहिलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस ह्याच नाटकाने मिळवून दिलं मला. कोविड काळानंतर आम्ही कलाकारांनी एकमेकांच्या विश्वासावर उभं केलेलं हे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं प्रेम केलं, अत्यंत व्यस्त schedule मधून आम्ही कुर्रर्रर्र ह्या नाटकाचे 2 वर्षात 200हुन अधिक प्रयोग केले. पण व्यस्त तारखांमुळे प्रयोगांची संख्या कमी झाली backstage आणि सहकलाकारांना जास्तीत जास्त प्रयोग करता यावेत आणि नाटकाचे आणखी भरघोस प्रयोग व्हावे ह्यासाठी सर्वानुमते घेतलेला हा निर्णय आहे’.
‘काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय काय असतो पहिल्यांदा अनुभवला पण हा निर्णय चांगल्या भावनेने घेतला गेला आहे. नाटकासाठीच घेतला आहे आणि तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या निर्णयाचा मोठ्या मनाने स्विकार कराल अशी खात्री आहे. ह्यापूर्वी जसं प्रेम केलंत तसंच प्रेम तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या कुर्रर्रर्र ह्या नाटकावर नवीन संचावर कराल अशी आशा आहे. मी अजूनही आमच्या म्हणतेय कारण शारीरिक रित्या exit घेतली तरी त्या नाटकाशी मी मनाने जोडले गेलेय, तिथून कधीच exit होत नसते. माझ्या शुभेच्छा कायम सोबत असतील. जिची खरंच कुठे शाखा नाही अशी विशाखा ताई विनोदाचा बाप पॅडी दादा माझी अत्यंत जवळची मैत्रीण मयुरा रानडे आणि supreme प्रियदर्शन दादा तुम्हाला व कुर्रर्रर्रच्या सर्व टीम ला पुढील प्रयोगांसाठी housefull शुभेच्छा. रंगमंचापासून फार काळ लांब राहूच शकत नाही. भेटू लवकरच…’